सकारात्मक बातमी ! स्वमग्नता ओळखण्यासाठी आता एआयएमएलचा वापर ! | पुढारी

सकारात्मक बातमी ! स्वमग्नता ओळखण्यासाठी आता एआयएमएलचा वापर !

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  केवळ प्रश्नावलीच्या आणि निरीक्षणाच्या माध्यमातून स्वमग्न मुला-मुलींची करण्यात येणारी ओळख आता कालबाह्य होणार आहे. तर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तसेच मशिन लर्निंगचा वापर करून आता स्वमग्न मुला-मुलींची ओळख पटविणे शक्य होणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करणार्‍या उपचारकर्त्यांना फार मोठा आधार मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी पुण्यातील व्हीआयआयटीच्या प्राध्यापिका डॉ. सुरुची देडगांवकर यांनी संशोधन केले आहे.

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नोलॉजी विद्यापीठात डॉ. रजनीशकौर सचदेव यांच्या मार्गदर्शनाखाली 2017 ते 2023 या काळात डॉ. देडगांवकर यांनी संबंधित संशोधन केले आहे. त्यांच्यासंशोधनाचे शीर्षक डिझाईन अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसीस ऑफ अ सपोर्ट सिस्टिम बेस्ड ऑन सेन्सरी पॅरामिटर्स फॉर ऑटिस्टिक पीपल आहे. यासंदर्भात डॉ.देडगांवकर म्हणाल्या, ‘स्वमग्नता’ म्हणजे ‘ऑटिझम’ हा एक मज्जातंतूचा विकार आहे, जो वयाच्या लहानपणीच लक्षात येतो. स्वमग्न मुलांमध्ये इतर काही अक्षमता आढळून येतात, ज्यामध्ये संबंधित मुला-मुलींमध्ये ऐकणे व आवाजाचा गोंधळ उडणे आणि कोणतीही गोष्ट बघितल्यावर त्यानुसार कृती करण्यातील असमर्थता या आहेत. या अक्षमता वेळेत ओळखून त्यावर योग्य उपचार करणे आवश्यक असते. सध्या यासाठी पालकांना मोठी प्रश्नावली विचारली जाते व गुण मोजले जातात. परंतु ही प्रश्नावली पूर्णपणे पालकांच्या निरीक्षणावर अवलंबून असते. योग्य निरीक्षण करून ते उपचारकत्र्यांना सांगणे हे पालकांसाठी अवघड, वेळखाऊ तसेच काही वेळेस लाजिरवाणे असते.

आम्ही याचा गांभिर्याने विचार केला व ही समस्या सोडविण्यासाठी या समस्येचे तज्ज्ञ डॉ. सुनील गोडबोले यांच्याशी सल्लामसलत केली. त्यांनी दिलेल्या माहिती व मार्गदर्शनानुसार आर्टीफिशीयल इंटेलिजीन्स, आरोग्य घटक चेह-याचे हावभाव व मशीन लर्निंग तंत्रज्ञान वापरून प्रणाली विकसीत केली व ती यशस्वी झाली. हे संशोधन करण्यामागचा आमचा हेतू हा देशातील स्वमग्नतेविषयी अजाण व अनभिज्ञ असणार्‍या पालकांच्या मुलांना अचूक, योग्य वेळेत व कमी खर्चात उपचार मिळावे हाच आहे. या संशोधनाचा फायदा स्वमग्नतेच्या समस्येवर काम करणार्‍या सर्व उपचारकर्ते, संशोधक व अभ्यासक यांना होईल. हे संशोधन देशासाठी कामी आले तर मी स्वत:ला धन्य समजेन असे देखील डॉ. देडगांवकर यांनी स्पष्ट केले.

स्वमग्नता म्हणजे नेमके काय?
स्वमग्नता हा एक प्रकारचा मनोविकार म्हणून ओळखला जातो. याचे पूर्ण नाव ‘सायकोन्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंटल डिसऑर्डर’ असे आहे. इंग्रजीत त्याला ‘ऑटिझम’ म्हणतात. ही एक गुंतागुंतीची मानसिक स्थिती आहे. स्वमग्नता वा ऑटिझम ही जन्मस्थ अवस्था आहे. तो रोग नाही. याचा शोध लिओ केनर यांनी 1943 मध्ये लावला. अशा व्यक्ती आपल्याच विश्वात आणि विचारात रममाण असतात. अशा व्यक्ती संवेदनांचे अर्थ लावू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना त्यावर प्रतिक्रिया देता येत नाही. स्वमग्नता हे विकाराचे एक लक्षण आहे. परंतु, हे एक लक्षण म्हणजे पूर्ण विकार, असे म्हणता येणार नाही, म्हणून ही गुंतागुंतीची मानसिक स्थिती आहे.

Back to top button