सहकार आयुक्तालयाविरोधात लेखापरीक्षकांचा एल्गार | पुढारी

सहकार आयुक्तालयाविरोधात लेखापरीक्षकांचा एल्गार

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्य सरकारने सहकार विभागातील लेखापरीक्षण कक्षातील सर्व कर्मचार्‍यांना लेखापरीक्षक या पदाच्या कर्तव्यासाठी नियुक्ती दिली आहे. त्यामुळे सहकार आयुक्तालयाच्या नामतालिकेवर (पॅनेल) विभागातील लेखापरीक्षकांना नोंदणी करण्याच्या सक्तीला महाराष्ट्र स्टेट को-ऑप. डिपार्टमेंटल ऑडिटर्स असोसिएशनने विरोध केला आहे. त्यामुळे आयुक्तालय विरुध्द लेखापरीक्षक संघटना, असा नवा संघर्ष दिसण्याची चिन्हे आहेत. सहकार आयुक्तालयाने लेखा परीक्षकांच्या पॅनेलसाठी परिपत्रक जारी केले आहे.
त्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन ऑडिटर्स असोसिएशनच्या वतीने पत्रकान्वये केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सहकार आयुक्तालयाच्या परिपत्रकानुसार कोणीही नामतालिकेसाठी ऑनलाइन नोंदणी करू नये. कारण, शासकीय लेखापरीक्षकांना नोंदणी करण्याची सक्ती करणे, ही बाब संघटनेला मान्य नाही. त्यासाठी संघटनेने सक्तीला यापूर्वीही विरोध केला असून, आजही विरोध असल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली.
शासकीय लेखापरीक्षकांनी सहकारच्या पॅनेलवरील ऑनलाइन नोंदणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ही संख्या सुमारे 3 हजार 995 इतकी आहे. लेखापरीक्षणासाठी शासनानेच आमची नेमणूक लेखापरीक्षक म्हणून केलेली असताना पुन्हा पॅनेलवर ऑनलाइन अर्ज करण्याची गरजच नाही. तशी मागणी आम्ही सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील व सहकार सचिव राजेश कुमार यांच्याकडेही केली आहे. 
                      -चंद्रशेखर भोयर, अध्यक्ष,  महाराष्ट्र स्टेट को-ऑप. डिपार्टमेंटल ऑडिटर्स असोसिएशन

Back to top button