ज्येष्ठांनाही जड झाले नात्यांचे ओझे! घटस्फोटासाठी अर्ज करण्याकडे वाढला कल | पुढारी

ज्येष्ठांनाही जड झाले नात्यांचे ओझे! घटस्फोटासाठी अर्ज करण्याकडे वाढला कल

शंकर कवडे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आयुष्यभर धावपळ करून संसाराच्या सुरुवातीला साथीदाराबरोबर न मिळालेले क्षण आयुष्याच्या संध्याकाळी पुन्हा जगता यावेत, यासाठी उतारवयात प्रत्येक जण धडपड करतो. प्रेमात आकंठ बुडालेले पती-पत्नी सेकंड इनिंगच्या टप्प्यातही थरथरलेल्या हातांना हात अन् एकमेकांना साथ देत त्याच उत्साहाने संसार फुलवितात. मात्र, सध्या बदलत्या काळानुसार आता उतारवयातही पती-पत्नीला या नात्याचे ओझे सहन होताना दिसत नाही म्हणून ते उतरविण्याची धडपड ज्येष्ठांकडून सुरू असल्याचे कौटुंबिक न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणांवरून दिसून येते.

वृद्धापकाळात दोन गोष्टी हाताशी असतात. एक म्हणजे निवृत्तीनंतर मिळालेला वेळ आणि दुसरी कमतरता ती म्हणजे जवळच्या माणसांचा सहवास. जिथे विचार जुळतात तिथे संसार फुलतो. मात्र, वृद्धापकाळात साथीदाराचा स्वभाव सहन करण्याची सहनशीलता संपलेली असते. मात्र, घरातील वडीलधार्या मंडळींचा आधार गमावल्यावर व मुले मोठी होऊन स्वतंत्र झाल्यावर साथीदाराबरोबर राहण्यासारखे कारण उरत नाही आणि आयुष्यभर जे सोसले ते आता का सोसावे? उरलेले आयुष्य मनासारखे जगता यावे, यासाठी घटस्फोटासारखा मार्ग काही वृद्ध जोडपी निवडत असल्याचे निरीक्षण अ‍ॅड. आनंद धोत्रे यांनी नोंदविले.

मुलांचा पालकांना वेगळे होण्याचा सल्ला

पालकांमधील वाद किंवा एका साथीदाराने दुसर्‍या साथीदाराला केलेली मारहाण, शिवीगाळ लहानपणापासून पाहिल्याने आर्थिकरीत्या स्वतंत्र झालेली मुलेच कधीकधी पालकांना वेगळे होण्याचा सल्ला देतात. याखेरीज आई व वडिलांनी विभक्त होण्याबाबत घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देतात, असे निरीक्षण वकीलवर्गाकडून नोंदविण्यात आले.

प्रकरण : 1
माधव हा पोलिस खात्यात, तर वैभवी (दोघांचीही नावे बदललेली आहेत) ही शिक्षिका म्हणून नोकरी करीत होती. सध्या माधव हा 65 वर्षांचा असून, वैभवी 63 वर्षांची आहे. त्या दोघांनाही एक मुलगी आहे. लग्नाच्या काही वर्षांनंतर दोघांनाही कामानिमित्त एकत्र राहता आले नाही. निवृत्तीनंतरही दोघांना एकमेकांची सवय नसल्याने त्यांना एकमेकांच्या गोष्टी खटकू लागल्या. एकुलत्या एक मुलीच्या लग्नानंतर त्यांनी परस्परसंमतीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला.
न्यायालयाने तो मंजूर केला.

प्रकरण : 2
अनुराग आणि प्रेरणा (दोघांची नावे बदलली आहेत) या दाम्पत्यातील अनुराग हा पाटबंधारे खात्यातून निवृत्त झाला असून, प्रेरणा ही शिक्षिका म्हणून निवृत्त झाली आहे. अनुरागचे वय 70, तर प्रेरणा 65 वर्षांची. अनुराग हा प्रेरणाला दारू पिऊन शिवीगाळ करीत होता. त्या दोघांमधील वादाला कंटाळून अनुरागचा मुलगा व सुनेने दोघांना न्यायालयात आणत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.

नोकरदार राहिलेल्या ज्येष्ठांच्या घटस्फोटासाठीच्या अर्जाचे प्रमाण लक्षणीय आहे. शारीरिक अथवा मानसिक छळ, वादविवाद यामुळे आई-वडिलांनी घेतलेल्या निर्णयाला मुलांचाही पाठिंबा दिसून येतो. यामध्ये परस्परसंमतीने दाखल होणार्या अर्जांचे प्रमाण जास्त आहे. न्यायालयात दाखल होत असलेल्या ज्येष्ठांच्या प्रकरणांमुळे एकप्रकारे कुटुंबव्यवस्था ढासळत चालली आहे.

– अ‍ॅड. अजिंक्य मिरगळ

पूर्वी जे लोक कुटुंबव्यवस्था टिकवायचे ते आता स्वतःचे विचार, स्वातंत्र्य या मुद्द्याकडे वळताना दिसतात. एकमेकांचा आधार घेताना एकमेकांसोबत जगताना, एकमेकांशिवाय आयुष्य अपूर्ण वाटणारी पिढी आता लोप पावत चालली आहे. तरुणाईसह ज्येष्ठांमध्येही घटस्फोटाचे वाढत जाणारे प्रमाण ही कुटुंबव्यवस्थेसाठी चिंताजनक गोष्ट आहे.

– अ‍ॅड. भाग्यश्री गुजर

Back to top button