Pune pollution News : पुणेकरांनो, सावधान..! प्रदूषणात पुणे देशात तिसरे | पुढारी

Pune pollution News : पुणेकरांनो, सावधान..! प्रदूषणात पुणे देशात तिसरे

आशिष देशमुख

पुणे : धूलिकण प्रदूषणात शनिवारी पुणे शहराने मुंबईलाही मागे टाकत देशातील अतिप्रदूषित शहरांच्या रांगेत तिसरे स्थान मिळविले. सूक्ष्म व अतिसूक्ष्म धूलिकण प्रदूषणात शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर आघाडीवर असून, दिल्ली व अहमदाबादनंतर पुणे शहराचा नंबर लागला. शहराच्या हवेची सरासरी गुणवत्ता 149 इतकी होती. पावसाळा संपताच देशातील बहुतांश शहरांतील वायुप्रदूषणात वाढ झाली आहे. यात धूलिकण प्रदूषणात देशात दिल्ली, अहमदाबाद, पुणे व मुंबई ही चार शहरे आघाडीवर आहेत.

सूक्ष्म धूलिकण (पीएम-10) अतिसूक्ष्म धूलिकण (पीएम-2.5) यासह ओझोन थर, नायट्रोजन डायऑक्साईड व कार्बन डायऑक्साईड हे घटक कारणीभूत ठरतात. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची पुण्यातील सफर, केंद्रीय प्रदूषण मंडळ हे प्रदूषण दर मिनिटाला मोजते. त्या अहवालात पुणे शनिवारी देशात तिसर्‍या क्रमांकाचे प्रदूषित शहर ठरले. शहरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. सर्वाधिक वाहनांची कोंडी ही स्वारगेट व शिवाजीनगर भागात होते. त्यामुळे या भागातील हवेची गुणवत्ता ही आरोग्यास घातक गटात मोडली गेली. या भागात मास्क वापरण्याचा इशारा प्रदूषण मोजणार्‍या संस्थांनी दिला आहे.

Back to top button