डॉ. संजीव ठाकूर यांना अटक करा : आ. रवींद्र धंगेकर यांची मागणी | पुढारी

डॉ. संजीव ठाकूर यांना अटक करा : आ. रवींद्र धंगेकर यांची मागणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ललित पाटीलवर ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूरच उपचार करीत असल्याचे रजिस्टरमधील माहितीवरून निष्पन्न झाले आहे. चुकीचे काम केले असताना डॉ. ठाकूर यांना निलंबित करण्याचे सोडून राज्य शासन त्यांना पाठीशी घालत आहे. ठाकूर यांनी हवालामार्फत लाखो रुपये घेतले आहेत. ललितला पळून जाण्याला ठाकूरच जबाबदार असल्याने त्यांना या प्रकरणात अटक करण्याची मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच या प्रकरणात आणखी एक मंत्री सातत्याने ललितला सातत्याने फोन करत होता, असाही आरोप धंगेकर यांनी केला.

धंगेकर म्हणाले, ‘ललित पाटील प्रकरणामुळे सरकारची नाचक्की झाली आहे. ललितचा एन्काउंटर करून तपास थांबविण्याचादेखील प्रयत्न होईल. सरकारला केवळ राजकारण करायचे आहे. तरुणाई ड्रग्जच्या आहारी चालली असताना सरकारचे शहरातील तरुणाईकडे लक्ष नाही. हे सरकार ललित पाटीलच्या पैशाखाली दबले गेले आहे.’ ललितसारख्या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर राष्ट्रीय तपास यंत्रणांमार्फत या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी धंगेकर यांनी केली.

ललितचे उद्योग पोलिसांच्या मेहरबानीने सुरू होते. डॉ. ठाकूर यांना मंत्रिमंडळातील एका मंत्र्याचा वरदहस्त आहे. ठाकूर यांना पहिल्या दिवशी अटक होण्याची गरज होती. ठाकूर आणि ललित यांची नार्को टेस्ट केली पाहिजे.  ज्याप्रमाणे सर्वत्र फिरला, त्यानुसार ललित आजारी वाटत नव्हता. पळून गेल्यानंतर ललितचा शोध घेत असताना आदल्या दिवशी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, ललित सापडणार अन् दुसर्‍या दिवशी लगेच तो सापडतो. याचाच अर्थ त्याला पळून लावण्यास अधिकारीही सहभागी असल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला. जबाबदार पोलिसव डॉ. ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

हेही वाचा

Chhagan Bhujbal : होळकर-पवारांनी साथ सोडल्याने भुजबळांची वाट बिकट?

तुजं माजं सपान: वीरूच्या साथीने पुन्हा तालमीत धुरळा उडवेल का प्राजक्ता?

Back to top button