यंदा उसाची पळवापळवी ! एफआरपीसह सर्व कपात निधी दिल्यावरच ऊसगाळप परवाना मिळणार | पुढारी

यंदा उसाची पळवापळवी ! एफआरपीसह सर्व कपात निधी दिल्यावरच ऊसगाळप परवाना मिळणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍यांच्या उसाची थकीत एफआरपीची रक्कम, ऊस तोडणी महामंडळाचे प्रतिटन 17 रुपयांप्रमाणे थकीत सुमारे 197 कोटी रुपये व अन्य कपात निधी दिल्याशिवाय यंदाचा 2023-24 च्या हंगामातील ऊस गाळप परवाना दिला जाणार नाही. त्यामुळे एकतर आर्थिकदृष्ट्या सक्षम कारखाने लवकर सुरू होऊन कार्यक्षेत्राबाहेरील उसाची पळवापळवी होण्याची दाट शक्यता आहे. शिवाय, कोणतीही रक्कम न देता विनापरवाना ऊस गाळपही सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 19 ऑक्टोबर रोजी मंत्री समितीची बैठक होऊन एक नोव्हेंबरपासून यंदाचा हंगाम 2023 -24 सुरू करण्याचा निर्णय झाला.

ऊस गाळप हंगाम सुरू करण्यापूर्वी कारखान्यांनी प्राधान्याने मागील हंगामातील थकीत एफआरपी रक्कम दिलेली असली पाहिजे, ही प्रमुख अट आहे. त्याशिवाय मुख्यमंत्री सहाय्यता निधी प्रतिटन 5 रुपये, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट निधी प्रतिटन 1 रुपया, राज्य सहकारी साखर कारखाना संघ वर्गणी प्रतिटन 1 रुपया, साखर संकुल देखभाल व दुरुस्तीकरिता निधी 50 पैसे प्रतिटन आणि स्व. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ निधी थकीत प्रतिटन 17 रुपये दिल्यानंतरच यंदाचा ऊस गाळप परवाना दिला जाणार आहे. तसेच ज्या कारखान्यांकडे शासकीय भागभांडवल व हमी शुल्क आहे, अशा कारखान्यांनी हंगामात टॅगिंगद्वारे प्रतिक्विंटल 50 व 25 रुपये रक्कम वसूल केली जाते.

साखर आयुक्तालयाची अवस्था आडकित्यात सुपारी
साखर आयुक्तालयाकडून विनापरवाना ऊस गाळप केल्यास संबंधित कारखान्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. गतवर्षी तोडणी महामंडळास दयावयाच्या एकूण 10 रुपयांतील प्रथम तीन रुपये देऊन गाळप परवाना देण्यास सरकारने परवानगी दिली होती. आता दोन वर्षांतील ऊस गाळपावर मिळून 17 रुपयांप्रमाणे होणारी रक्कम कारखान्यांना दयावी लागणार आहे. वास्तविकता यावर मंत्री समितीच्या बैठकीत तोडगा निघून टप्प्याटप्प्याने ही रक्कम घेण्यास परवानगी मिळायला हवी होती. त्यावर निर्णयच न झाल्याने पेच निर्माण झाला आहे. तर, दुसरीकडे कारखान्यांकडून विनापरवाना ऊस गाळप सुरू होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे यामध्ये साखर आयुक्तालयाचीच अवस्था आडकित्यात सुपारी अशी झालेली आहे.

ऊसगाळप हंगाम 2023-24 ची स्थिती

गाळपासाठी उपलब्ध होणारा
एकूण ऊस – 1022.73 लाख टन
प 90 टक्के ऊस गाळपास येईल त्यानुसारची स्थिती –
921 लाख टन
प इथेनॉलकडे वळणारी
साखर- 15 लाख टन
प निव्वळ साखर उत्पादन- 88.58 लाख टन

Back to top button