Pune News : ‘मागेल त्याला शेततळे’तून 2.60 कोटींचे अनुदान वाटप | पुढारी

Pune News : ‘मागेल त्याला शेततळे’तून 2.60 कोटींचे अनुदान वाटप

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत ‘मागेल त्याला शेततळे’ (वैयक्तिक शेततळे) योजनेमध्ये पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात सर्वाधिक 135 शेततळी पूर्ण झाली आहेत. वैयक्तिक शेततळे योजनेत आत्तापर्यंत 718 लाभार्थ्यांना ऑनलाईनद्वारे काम सुरू करण्यासाठी पूर्वसंमती देण्यात आली. त्यापैकी 423 लाभार्थी शेतकर्‍यांना काम पूर्ण झाल्यानंतर 2 कोटी 60 लाख रुपयांइतके अनुदान त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली.

आर्थिक वर्ष 2023-24 अंर्त जिल्ह्यात शेततळे योजनेसाठी सुमारे 4 कोटी 44 लाख 44 हजार रुपयांइतके अनुदान मंजूर झालेले आहे. योजनेतंर्गत आठ आकारमानाच्या शेततळ्यांसाठी कमाल 75 हजार रुपये रक्कमेच्या मर्यादेत शेतकर्‍यांना अनुदान दिले जाते. पूर्वसंमती दिलेल्या शेतकर्‍यांकडून शेततळ्यांची उभारणी पूर्ण झाल्यानंतर मोका तपासणी होईल. त्यानंतर संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर शेततळे अनुदान दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मागेल त्याला शेततळे योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. अधिक माहितीसाठी शेतकर्‍यांनी नजिकच्या मंडल कृषी अधिकारी कार्यालय किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

पुरंदर, बारामतीमध्ये सर्वाधिक शेततळी…
जिल्ह्यात पूर्ण झालेल्या 423 शेततळ्यांची तालुकानिहाय संख्या व त्यापुढे वाटप झालेली अनुदान रक्कम लाख रुपयात पुढीलप्रमाणे ः आंबेगाव 17-11.03, बारामती 76-53.04, भोर 1-29 हजार, दौंड 22-14.02, हवेली 3-61 हजार, इंदापूर 54-36.51, जुन्नर 34-20.80, खेड 14- 6.12, मावळ 2-1.10, मुळशी 3-1.20, पुरंदर 135-78.79, शिरूर 57-34.74, वेल्हा 5-2.38 लाख रुपये.

हेही वाचा :

Back to top button