

पुणे/मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मियामी आणि शिकागो येथील कारागृहांच्या धर्तीवर मुंबईत चेंबूरमध्ये महिला बालकल्याण विभागाच्या जागेवर कच्च्या कैद्यांसाठी बहुमजली कारागृह बांधण्यात येणार असून यामुळे मुंबईतील आर्थर रोड कारागृहावरील ताण कमी होईल, अशी माहिती कारागृहाचे अतिरिक्त महासंचालक सुनील रामानंद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रामानंद म्हणाले, तुरुंगांची क्षमता वाढविण्याची गरज आहे. गेल्या दहा वर्षांत कारागृहातील कैद्यांची संख्या 24 हजारांपासून 37 हजारांपर्यंत वाढली आहे. कोरोनामुळे पॅरोल आणि जामिनावर 13 हजार कैदी बाहेर आहेत. तशी ही संख्या सुमारे 45 हजारांवर गेली आहे. हे बंदी परत आले, तर कारागृहात क्षमतेपेक्षा 180 टक्के कैदी अधिक होतील,
म्हणूनच कारागृह उभारणीत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप राबवता येईल का हे तपासले जात आहे. तसे शक्य झाले तर पुण्यात पाच हजार क्षमतेचे कारागृह बांधता येऊ शकते. पालघर, गोंदिया, पुणे येथे कारागृहासाठी प्रस्ताव शासनाकडे देण्यात आला आहे.
आता कारागृहांत कैद्यांसाठी रेस्टॉरंट
राज्यांतील कारागृहात आता रेस्टॉरंटच्या धर्तीवर खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे. हे खाद्यपदार्थ बंद्यांना कॅण्टीनमधून खरेदी करता येणार आहेत. पूर्वी मिळत असलेल्या खाद्यपदार्थांच्या संख्येत वाढ करीत काही चवीष्ट व मागणी असलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर कैद्यांना हेअर प्रॉडक्टही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
अंडी, दूध, बेकरी उत्पादने कारागृहांतील कॅन्टीनमध्ये उपलब्ध होती. या खाद्यपदार्थांमध्ये वाढ करण्यात आली असून, रेडी टू इट प्रॉडक्टचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच मासे, चिकन, मिठाई, सोनपापडी, ड्रायफ्रूट, कचोरी, समोसा, पनीर, विविध प्रकारचे ज्यूस, अंडाकरी, मिनरल वॉटर, फळे, शुद्ध तूप आदी पदार्थांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. कोरोनाकाळात कैद्यांना प्रोटीन आणि व्हिटॅमिन असलेला डाएट देण्यात येत आहे.