

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मामुर्डी व सांगवडे येथे पवना नदीवर नव्याने पूल उभारण्यात येत आहे. त्याचा खर्च 15 कोटींवरून 50 कोटींवर पोहोचला आहे. या वाढीव खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी बुधवारी (दि.25) झालेल्या बैठकीत सर्वसाधारण सभेची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. वाहतूक रहदारी सुरळीत व सुरक्षित व्हावी, म्हणून या भागात पूल उभारण्याची अनेक वर्षांपासूनची जुनी मागणी आहे. त्यानुसार, महापालिका मामुर्डी येथील स्मशानमूभीजवळ पवना नदीवर पूल बांधत आहे. त्या कामासाठी नुकताच सल्लागार नेमण्यात आला आहे.
हा पूल जलसंपदा विभागाच्या मान्यतेने बांधण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या 2023-24 च्या अर्थसंकल्पात 15 कोटींच्या निधीची तरतूद करण्यास सर्वसाधारण सभेने 29 मार्च 2023 ला प्रशासकीय मान्यता दिली होती.
पुलासाठी जलसंपदा विभागाने राज्य शासनाच्या 3 मे 2018 च्या मार्गदर्शक सूचनाच्या (महसूल) परिपत्रकानुसार पूल बांधण्यात यावा. त्याचे काटेकारपणे पालन करावे, असे महापालिकेस कळविले आहे. त्या परिपत्रकानुसार पुलाची जोता पातळी लाल पूररेषेपेक्षा 1.50 मीटर उंचीवर असणे आवश्यक आहे.
त्यानुसार, सद्यस्थितीतील पुलाचे पातळीपेक्षा नियोजित पुलाची उंची वाढणार आहे. मामुर्डी बाजूकडील जोडरस्त्यासाठी सुधारीत विकास आराखड्यानुसार नदी समांतर रस्ता करण्याचे नियोजन आहे. जलसंपदा परिपत्रकानुसार उच्चतम पूररेषा गृहीत धरू नवीन पूल बांधण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्यामुळे पूल उभारण्याच्या खर्च 15 कोटीवरून सन 2022-23 च्या चालू दरसुचीनुसार 50 कोटींवर जाणार आहे. सन 2023-24 च्या अर्थसंकल्पात विशेष योजना लेखाशिर्षात 50 कोटींच्या निधीची तरतूद करण्यास आयुक्त सिंह यांनी सर्वसाधारण सभेची सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे पूल उभारण्याचा निधीचा अडसर दूर झाला आहे.
नव्या आराखड्यानुसार पवना नदीवरील मुख्य पूल 12 मीटर रुंदीचा 90 मीटर लांबीचा असणार आहे. त्यासाठी 16 कोटी 50 लाख खर्च आहे. मामुर्डीकडील 12 मीटरचा जोडरस्ता 300 मीटर लांब आहे. त्यासाठी 22 कोटी 50 लाख खर्च आहे. सांगवडेकडील 12 मीटरचा जोडरस्ता 130 मीटर लांब आहे. विद्युत दिव्याचे खांब बसविण्यासाठी 1 कोटीचा खर्च आहे. असा एकूण 50 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.