Yuva Sangharsh Yatra : युवा संघर्ष यात्रा ही युवा पिढीची दिंडी : शरद पवार | पुढारी

Yuva Sangharsh Yatra : युवा संघर्ष यात्रा ही युवा पिढीची दिंडी : शरद पवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेला आज पुण्यातून सुरूवात झाली असून युवा संघर्ष यात्रेला युवकांनी मोठी गर्दी केली आहे. शरद पवार आणि रोहित पवार यांचे युवकांकडून जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी जेसीबीमधून फुलांची उधळण करण्यात आली. टिळक स्मारकाजवळ ही यात्रा पोहोचली असून पुण्यातील टिळक स्मारक हॉलमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी खासदार शरद पवार बोलत होते.

ते म्हणाले, रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा ही युवा पिढीची दिंडी आहे. या संघर्ष यात्रेतून युवा पिढीला प्रोत्सहन मिळेल. तसेच ही आशीर्वाद यात्रा तरुणांसाठी महत्त्वाची असून समाजात जागृती निर्माण करण्याचा मोठा प्रयत्न आहे.युवा संघर्ष यात्रा जर आग्रह करत असेल तर सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडणार. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या तरुणांच्या मागण्यासाठी बैठक घ्यावी. त्या बैठकीला मी उपस्थित राहून सरकारकडून या मागण्या मान्य करून घेऊ, अन्यथा काय करायचं ते आपण बघू, मात्र सरकार तुमच्या मागण्यांबाबत नक्कीच सकारात्मक विचार करणार अशी अपेक्षाही शरद पवार यांनी व्यक्त केली.

युवा संघर्ष यात्रेला शरद पवारांचा पाठींबा

पुण्यातून आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेली युवा संघर्ष यात्रा सुरु झाली. ११ वाजून ३० मिनिटांनी टिळक स्मारक येथे पदयात्रा पोहोचली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार युवा संघर्ष यात्रेला पाठींबा दर्शविला. ‘युवा संघर्ष यात्रेला माझा पाठिंबा आहे! स्वाक्षरी मोहीम’ या आशयाच्या फलकावर पवारांनी स्वाक्षरी करून युवा संघर्ष यात्रेला पाठींबा दिला .

‘या’ आहेत प्रमुख मागण्या?

  • कंत्राटी नोकरभरती रद्द करा.
  • 2 लाख 50 हजार उमेदवारांची रखडलेली भरती प्रक्रिया तात्काळ सुरु करा.
  • अवाजवी परीक्षा शुल्क रद्द करण्यासाठी.
  • जातीनिहाय जनगणना करण्यात यावी.
  • सक्षम आणि कार्यक्षम आरोग्य व्यवस्था उभी करावी
  • क्रीडा विभागाचं सक्षमीकरण व्हावे
  • होतकरू खेळाडूंना संधी मिळावी
  • पेपरफुटी विरोधात कायदा
  • शाळा दत्तक योजना रद्द करा.
  • बेरोजगार युवांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याज माफी मिळावी
  • नोकरदार महिला आणि विद्यार्थिनींसाठी वसतिगृहे मिळावी
  • समुह शाळा योजना रद्द करावी.
  • रखडलेल्या नियुक्त्या त्वरित देण्यात याव्यात.
  • महिला सुरक्षेसाठी शक्ती कायदा आणावा.
  • सारथी, बार्टी, महाज्योती आणि TRTI संस्थाचे सक्षमीकरण होण्यासाठी.
  • नोकर भरतीतील भ्रष्टाचार रोखण्यात यावा
  • TRTI संस्थेसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद मिळालीच पाहिजे.
  • सर्व भरती प्रक्रिया MPSC मार्फत करण्यात यावी
  •  प्रयोगशील युवा शेतकऱ्यांसाठी विशेष योजना असावी
  • शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत
  • असंघटीत क्षेत्रातील युवांसाठी Reskilling, Up Skilling देण्यात यावे
  • युवा आयोगाची स्थापना करण्यात यावी.
  • विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय अद्ययावत वसतिगृह मिळालेच पाहिजे.
  • महिलांची सायबर सुरक्षा सक्षमपणे राबिविण्यासाठी.
  • तालुका स्तरावर MIDC ची स्थापना आणि अस्तित्वात असणाऱ्या MIDC च्या सक्षमीकरणासाठी.
  • अमरावती या Two Tier शहरांमध्ये IT क्षेत्राच्या विकासासाठी धोरण आणण्यात यावे
  • ड्रग्जच्या विळख्यात सापडलेली तरुणाई. या प्रमुख मागण्यासाठी रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा निघाली आहे.

पुणे ते नागपूर असा असेल युवा संघर्ष यात्रेचा प्रवास?

पुणे ते नागपूर असा हा आठशे किलोमीटरचा युवा संघर्ष यात्रेचा प्रवास असणार आहे. तब्बल 45 दिवसांचा हा प्रवास असणार आहे. पुण्यातील तुळापूर येथून या यात्रेला सुरुवात झाली असून पुढे काष्टी, कर्जत, पाटोदा, बीड, जातेगाव, पिंपळगाव, कुंभार, परतुर, जिंतूर, सेनगाव, वनोजा, वाशिम, कारंजा, पापळ, पुलगाव, सेवाग्राम, बाजार गाव, नागपूर येथे या युवा संघर्ष यात्रेचा समारोप होणार आहे.

Back to top button