पुण्यातील भाजप प्रदेशाध्यक्षांच्या भूमिकेने राष्ट्रवादी संभ्रमात | पुढारी

पुण्यातील भाजप प्रदेशाध्यक्षांच्या भूमिकेने राष्ट्रवादी संभ्रमात

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची महायुती आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महायुतीच्या माध्यमातून एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट असताना भाजप प्रदेशाध्यक्षांनी मात्र राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या मतदारसंघात विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे शहरात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. त्यामधील पाच ठिकाणी भाजपचे आमदार असून, दोन ठिकाणी राष्ट्रवादी तर एका जागेवर काँग्रेसचे आमदार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेना-भाजपसमवेत जाण्याचा निर्णय घेतल्याने आता तिन्ही पक्ष एकत्र येऊनच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढविणार असल्याचे या पक्षांच्या नेत्यांनी जाहीर केले आहे. पुण्यात मात्र भाजपने वेगळा पवित्रा घेतला आहे की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
संबंधित बातम्या :
वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे हे अजित पवार यांच्यासमवेत आहेत. त्यामुळे ही जागा महायुतीत राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे जवळपास स्पष्ट आहे. असे असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शिवाजीनगर येथे एका कार्यक्रमात बोलताना यापुढील सर्व कार्यक्रम वडगाव शेरीत घ्या. तुमच्यासारखा कार्यकर्ता आम्हाला विधानसभेत हवा आहे. महायुती असली तरी वडगाव शेरीचे नेतृत्व जगदीश मुळीक यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतला जाईल, असे जाहीरपणे सांगितले.
बावनकुळे यांच्या या भूमिकेने भाजपचा राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या मतदारसंघावर डोळा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या गटात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. याचा थेट परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. भाजप अशा पध्दतीचे राजकारण करणार असेल तर लोकसभा निवडणुकीत काय करायचे? हे आम्ही ठरवू, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीतील पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.
भाजपचे अन्य इच्छुकही अस्वस्थ
माजी आमदार जगदीश मुळीक हे लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. तीन वर्षांपासून ते निवडणुकीची तयारी करीत आहेत. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्षांनी थेट जाहीर कार्यक्रमात पुढील सर्व कार्यक्रम वडगाव शेरी मतदारसंघात घ्या, असे सांगत त्यांचा लोकसभेच्या उमेदवारीचा पत्ता कट केला. त्यामुळे भाजपचा उमेदवार ठरला आहे की काय? याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली असून, भाजपचे अन्य इच्छुकही अस्वस्थ झाले आहेत.
विद्यमान आमदार ज्या पक्षाचा असेल, त्या पक्षाला ती जागा, असा नियम जागा वाटपात असतो. त्यानुसार महायुतीचे जागा वाटप होईल. मात्र, जर भाजप वडगाव शेरी विधानसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत असेल तर आम्हीपण पुणे लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहोत.
                                                      – दीपक मानकर,  शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 

Back to top button