

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणांतर्गत (म्हाडा) पुणे मंडळांतर्गत सप्टेंबर महिन्यात 5 हजार 863 सदनिकांसाठी ऑनलाइन सोडत जाहीर करण्यात आली आहे. सोडतीला पुन्हा 10 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. आता अर्जदारांना 30 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.
पुणे म्हाडाअंतर्गत 6 सप्टेंबर रोजी पुणे जिह्यासाठी 5 हजार 425, सोलापूर जिह्यात 69, सांगली 32 आणि कोल्हापूर जिह्यात 337 अशा एकूण 5 हजार 863 सदनिकांसाठी ऑनलाइन सोडत जाहीर करण्यात आली. पहिल्या सोडतीनुसार म्हाडाला केवळ 19 हजार ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले. 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत 64 हजार 822 नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी केली असून, त्यापैकी 41 हजार 765 अर्जदारांनी पैसे भरून पूर्ण प्रक्रिया केली आहे, जी संख्या जुन्या ऑनलाइन प्रणालीच्या तुलनेत दुपटीने कमी आहे.
नवीन ऑनलाइन प्रणाली पारदर्शक आणि सुलभ असल्याचे सांगण्यात आले असले, तरी अर्ज भरताना येणार्या अडचणी आणि तांत्रिक दुरुस्त्यांमुळे अर्जदारांना विलंब करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे याचा परिणाम यंदाच्याही ऑनलाइन सोडतीवर झाला असून, दुसर्यांदा 10 दिवस मुदतवाढ देण्याची नामुष्की म्हाडावर आली आहे.