Railway News : रेल्वे झाली दोन महिने फुल्ल | पुढारी

Railway News : रेल्वे झाली दोन महिने फुल्ल

राहुल हातोले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : दिवाळी, नाताळ आदी सण-उत्सव गावाकडे जाऊन कुटुंबियांसमवेत आनंदात साजरा करण्यासाठी अगोदरच नागरिकांनी रेल्वेचे आरक्षण केले आहे. त्यामुळे पुढील दोन महिने रेल्वे प्रवाशांनी फुल्ल भरून धावणार आहे; मात्र आता रेल्वेचे तिकीट मिळत नसल्याने खासगी प्रवासी वाहतूक कंपन्यांची चांदी झाली आहे. या खासगी वाहन कंपन्यांनी नेहमीच्या तिकीट दरापेक्षा सण- उत्सवामुळे दरात तिप्पट वाढ केली आहे. यामुळे प्रवाशांची मोठी आर्थिक लूट होत असल्याचे निर्दशानास आले आहे.
काही दिवसांवरच दसरा, दिवाळी आणि डिसेंबर महिन्यातील नाताळ सणासाठी नागरिकांनी रेल्वेचे आरक्षण करून ठेवले आहे. याकाळात रेल्वेच्या सामान्य वर्गाच्या डब्यात पाय ठेवायलादेखील जागा उपलब्ध होत नाही. अशा स्थितीत कुटुंंबियांसोबत प्रवास करणे अवघड होऊन जाते. म्हणून बरेच नागरिक खासगी वाहनांचा पर्याय निवडतात; मात्र या संधीचा गैरफायदा घेत खासगी वाहन कंपन्यांनी आपल्या नेहमीच्या तिकीट दरात सुमारे तिप्पट वाढ केली आहे. त्यामुळे या सण-उत्सवात नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार असून, आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.
दिवाळीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून विदर्भामध्ये जाणार्‍या प्रवाशांची संख्या अधिक असते. रोजीरोटी आणि शिक्षणानिमित्त वास्तव्य करणार्‍या शहरी भागातील नागरिकांची संख्या अधिक असल्याने, उत्सवकाळात या मार्गातील रेल्वेचे आरक्षण फुल्ल झाले असून, खासगी वाहनांचे दर तिप्पट झाल्यामुळे सणानिमित्त गावाकडे जाणार्‍या चाकरमान्यांच्या खिशाला ऐण सणात झळ बसणार आहे.

ज्यादा दराबाबत नियम :

इतर वेळेपेक्षा खासगी प्रवासी वाहन कंपन्या दीडपट भाडेवाढ करू शकतात; मात्र त्याहून अधिक दर वाढविल्यास त्याविरोधात प्रवासी आरटीओकडे तक्रार करू शकतात. त्यानुसार संबंधितांवर कारवाई केली जाते.

राज्यातील अधिक प्रवास होणार्‍या शहरांसाठीचे तिकीट दर :

पुणे-नागपूर प्रवास दर
इतर वेळचे उत्सव
दर  काळातील दर
रेल्वे ः 420 420
खासगी 1000 3500
पुणे-गोवा
रेल्वे ः 370 370
खासगी ः 1300 4000
पुणे – दिल्ली
रेल्वे ः 675 675
खासगी ः 3500 9950

रेल्वेमध्येही एजंटांचा सुळसुळाट :

दर तिकिटामागे दोनशे रुपये असे पैसे प्रवाशांकडून एजंट वसूल करतात. रांगेत उभे राहूनही तिकीट मिळत नसल्याने एजंटच्या सेटिंगमुळे तिकिटांपेक्षा दोनशे रूपये अधिक दिले की, हाती तिकीट मिळते. सण-उत्सव काळात एजंटचे दरही वाढतात. प्रत्येक तिकिटामागे तीनशे ते चारशे रूपये अधिक घेत हे एजंट तिकीट काढून देत असल्याची माहिती हाती आली आहे.
खासगी प्रवासी वाहन कंपन्यांनी तिकीट दर दीडपटहून अधिक वाढविल्यास त्याबाबत आरटीओकडे तक्रार करावी. याविरोधात संबंधितांस दंड आकारला जाईल. नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक सेवेचाच वापर करावा.
– अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड शहर.
सण-उत्सकाळात रेल्वेचे आरक्षण त्वरित फुल्ल होऊन जाते. यासाठी रेल्वेच्या वतीने जादा गाड्यांची सोय केली आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा.
– डॉ. रामदास भिसे, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग पुणे.

Back to top button