अखेर राजगडावर लागले मधमाश्यांच्या पोळांबाबत खबरदारीचे फलक | पुढारी

अखेर राजगडावर लागले मधमाश्यांच्या पोळांबाबत खबरदारीचे फलक

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  दुर्गम राजगडावर अतिउत्साही पर्यटकांच्या हुल्लडबाजीमुळे मधमाश्यांचे हल्ले वाढले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तसेच पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पुरातत्व विभागाने गडावर मधमाश्यांच्या पोळ्यांबाबत माहिती देणारे फलक उभारले आहेत. पर्यटकांनी खबरदारी म्हणून गडकोटांवर येताना सुगंधी द्रव्ये अंगावर मारू नयेत, असे आवाहन पुरातत्व विभागाने केले आहे. राजगडाच्या बालेकिल्ला, संजीवनी माची व सुवेळा माचीवरील कड्याच्या खडकात 20 ते 25 भलीमोठी मधमाशांची पोळी आहेत.

8 ऑक्टोबर रोजी मधमाश्यांच्या हल्ल्यात 25 हून अधिक पर्यटक जखमी झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुरातत्व विभागाने सहसंचालक डॉ. विलास वाहणे यांच्या देखरेखीखाली पहारेकरी बापू साबळे, सुरक्षारक्षक विशाल पिलावरे, आकाश कचरे यांनी दोन फलक उभारले. एक फलक शिवरायांच्या राजसदरेजवळील बालेकिल्ला मार्गावर, तर दुसरा पर्यटक निवासाजवळ उभारला आहे.

सुगंधी द्रव्यांचा वास, सिगारेट किंवा इतर धुरामुळे मधमाश्या बिथरून समोर येईल त्याला चावा घेतात. चावा घेतल्यानंतर 15 ते 20 मिनिटांत विषबाधा होत उलट्या, जुलाब होऊन शरीरातील पाणी कमी होते. श्वसनास त्रास होत रक्तदाब कमी होतो. त्यामध्ये मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे रुग्णाला तातडीने उपचाराची गरज असते.
                                         – डॉ. राहुल बोरसे,वैद्यकीय अधिकारी, वेल्हे
.

Back to top button