Pune News : पुण्यातील भिडेवाडा स्मारकासाठी भूसंपादन

Pune News : पुण्यातील भिडेवाडा स्मारकासाठी भूसंपादन

पुणे : ऐतिहासिक भिडेवाड्याच्या भूसंपादनासंदर्भातील दाव्याचा निकाल उच्च न्यायालयाने शासन व महापालिकेच्या बाजूने दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. येत्या तीन आठवड्यांत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केलेल्या शिवाजी रस्त्यावरील ऐतिहासिक भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक करण्यात येणार आहे.

हा वाडा मोडकळीस आला असून, महापालिकेने भूसंपादनाची प्रकिया सुरू केल्यानंतर 13 वर्षांपूर्वी या वाड्याचे जागामालक आणि पोटभाडेकरू महापालिका आणि राज्य शासनाविरोधात उच्च न्यायालयात गेले होते. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच महापालिका आणि राज्य शासनाच्या बाजूने निकाल दिला आहे.

महापालिकेने यापूर्वी केलेल्या अ‍ॅवॉर्डनुसारच जागेचा मोबदला देण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश देताना 2013 मध्ये नव्याने आलेल्या भूसंपादन कायद्यानुसार फरकाची रक्कमही देण्यात यावी, असे आदेशात नमूद केले आहे. यानंतरही अन्य कायदेशीर पेच निर्माण होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाने न्यायालयात कॅव्हेटही दाखल केले आहे. दरम्यान, या खटल्याचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्मारकाचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

त्यानुसार महापालिका प्रशासन कामालाही लागले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार जागेचे सुधारित मूल्यांकन करण्याचे काम करण्यात येत असून, ते लवकरच पूर्ण होईल. यानंतर भूसंपादनासाठी जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात येईल. नोटिशीचा 15 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर कायदेशीर सोपस्कार पार पाडून प्रत्यक्षात भूसंपादन करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

प्रशासनाकडून स्मारकाचे संकल्पचित्र तयार

भिडेवाडा स्मारकाचे संकल्पचित्र प्रशासनाने यापूर्वीच तयार करून ठेवले आहे. सुमारे 2 हजार चौरस फुटांचा हा वाडा आहे. तळमजल्यावर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा. साधारण 633 चौरस फुटांच्या वर्गखोलीत मुलींना शिकवताना सावित्रीबाई फुले. 363 चौरस फुटांचे मुख्याध्यापकांचे कार्यालय तसेच एक 123 चौरस फुटांची खोली असेल. पहिल्या मजल्यावर 663 चौरस फुटांचा बहुउद्देशीय हॉल, लायब—री शेल्फ्स आणि माहितीदर्शक फलक, स्टाफ रूम असेल. दुसर्‍या मजल्यावर असेम्ब्ली हॉल आणि वर्गखोली असेल. प्रत्येक मजल्यावर महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह राहील. पूर्वीप्रमाणेच हा वाडा दुमजली आणि त्याच रूपात उभारण्यात येणार असून, छत हे कौलारू असेल.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news