Baramati Lok Sabha : मित्र पक्षाच्या बारामतीवर भाजपचा डोळा; बावनकुळेंचा जिंकण्याचा निर्धार | पुढारी

Baramati Lok Sabha : मित्र पक्षाच्या बारामतीवर भाजपचा डोळा; बावनकुळेंचा जिंकण्याचा निर्धार

राजेंद्र खोमणे

नानगाव(पुणे) : बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हक्काचा मतदारसंघ मानला जातो. मात्र, मित्र पक्षाच्या या मतदारसंघावरच भाजपचा डोळा असून, तो जिंकण्याचा निर्धार प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दौंडमध्ये जनतेशी संवाद साधताना बोलून दाखवला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर बारामती मतदारसंघात अनेक समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे सतत लक्ष लागून असलेल्या भाजपला आता बारामती जिंकण्यासाठी अजित पवार यांचा पाठिंबा मिळाल्याने भाजपला बारामतीचा विजय सोपा दिसत आहे.

भाजपने याआधीच बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा दौरा झाला आहे. नुकताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला असून, यामध्ये त्यांनी दौंड आणि खडकवासला येथील नागरिकांशी संवाद साधला.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या दौर्‍यामुळे राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ हा ग्रामीण व शहरी भागात विस्तारला आहे.त्यामुळे बावनकुळे यांनी शहरी भाग एकत्रित करण्यासाठी खडकवासला मतदारसंघात दौरा केला, तर ग्रामीण भागासाठी दौंड येथे दौरा केला.

त्यामुळे एकाच दिवसात लोकसभा मतदारसंघातील शहरी ग्रामीण भागाच्या अंतर्गत येणार्‍या कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेत नागरिकांशी संवाद साधला. बारामती लोकसभेचा उमेदवार भाजपाचा की मित्र पक्षाचा, अशी चर्चादेखील यामुळे सुरू झाली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात आता भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) अशी युतीची एकत्रितपणे ताकद तयार झाली आहे.

मित्र पक्षांच्या हक्काच्या मतदारसंघात सुरू असलेले भाजपचे कार्यक्रम यामुळे चर्चेला चांगलेच उधाण आले. त्यामुळे येणार्‍या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काय होईल हे येणारा काळच ठरवेल. मात्र, सध्याची परिस्थिती पाहिली, तर भाजपने सगळीकडेच कंबर कसलेली दिसून येत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी यामध्ये पडलेल्या फुटीचा भाजप फायदा घेणार, अशीही राजकीय वर्तुळात चालली असून, भाजपचे नक्की चाललयं काय, असा प्रश्नही यानिमित्ताने पुढे येत आहे.

भाजपचे नक्की चाललंय काय?

सध्या भाजपने बारामती लोकसभेसाठी चांगलीच कंबर कसली असून, आपल्याच मित्र पक्षांच्या हक्काच्या मतदारसंघात जाऊन नागरिकांशी संवाद साधला जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा समजला जाणारा बालेकिल्ला बारामती लोकसभा मतदारसंघ, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हक्काचा समजला जाणारा ठाणे मतदारसंघ यामध्ये भाजपने जोरदार तयारी सुरू केल्यामुळे भाजपचे नक्की चाललंय काय, अशी चर्चादेखील राजकीय वर्तुळात सुरू असून, या चर्चेने चांगलाच जोर धरला आहे.

हेही वाचा

महावितरणच्या नवीन भोसरी उपविभाग-2 ची निर्मिती

Supriya Sule : महिल्या डब्यामध्ये तरुणाचे अंमली पदार्थाचे सेवन; सोशल मीडियावर संतापाची लाट

Back to top button