Rohit Pawar : बेरोजगारीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संघर्ष यात्रा : आ. रोहित पवार | पुढारी

Rohit Pawar : बेरोजगारीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संघर्ष यात्रा : आ. रोहित पवार

पिंपरी : राज्यातील बेरोजगारी या मुद्यासह युवकांच्या विविध प्रश्नांवर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तुळापूर ते नागपूर अशी युवा संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. यात्रेची सुरूवात 25 ऑक्टोबरला होणार असून, 7 डिसेंबर हिवाळी अधिवेशनामुळे नागपूर येथे त्यांचा समारोप करण्यात येणार आहे. ही 42 दिवसांची 800 किलोमीटर अंतराची अराजकीय यात्रा आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

पिंपरी येथे मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी माजी ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, रविकांत वरपे, काशिनाथ नखाते, देवेंद्र तायडे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, महिला शहराध्यक्षा ज्योती निंबाळकर, माजी नगसेविका सुलक्षणा धर, शकुंतला भाट, जनाबाई जाधव, गणेश भोंडवे आदी उपस्थित होते.

दहा जिल्ह्यांतून यात्रा जाणार

आमदार पवार म्हणाले, की वाढती बेरोजगारी, कंत्राटी नोकरभरती, अवाजवी परीक्षा शुल्क, पेपरपुटी विरोधात कायदा, शाळा दत्तक योजना, समुह शाळा योजना, रखडलेल्या नियुक्त्या, नोकर भरतीतील भ्रष्टाचार, रखडलेली भरती प्रकिया, शिक्षकांची रिक्त पदे, युवा आयोगाची स्थापना आदी प्रश्नांकडे राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन ते सोडवावेत, या मागणीसाठी यात्रा काढण्यात येत आहे. दहा जिल्ह्यांतील 360 गावांतून ही यात्रा जाणार आहे. त्यात कलाकार, खेळाडू सहभागी होणार आहेत. मुक्कामाच्या ठिकाणी सभा घेतली जाणार आहे.

40 हजार जणांनी केली नोंदणी

महात्मा गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेकांनी यात्रा काढली आहे. त्यांची कॉपी नव्हे तर, प्रेरणा घेऊन ही यात्रा काढली जात आहे. झोपेचे सोग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी तसेच, लोकांच्या हिताचे मुद्दे असल्याने यात्रेला पाठिंबा मिळत आहे. आतापर्यंत 40 हजार जणांनी नोंदणी केली आहे. या यात्रेत शहरातून अडीच हजार युवक सहभागी होणार आहेत, असे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी सांगितले.

हेही वाचा

Jalgaon Crime : जप्त केलेले डंपर वाळू सहित चोरीला

Gadchiroli Crime News: एकाच कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यूचे गूढ उकलले; दोघींना अटक

Pune News : रील्सद्वारे कायद्याचे धडे! कायदा साक्षरतेसाठी सोशल मीडियाचा वापर

Back to top button