लेकाच्या जीवासाठी माऊलीचे दातृत्व ; मुलाला केली किडनी दान | पुढारी

लेकाच्या जीवासाठी माऊलीचे दातृत्व ; मुलाला केली किडनी दान

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  लेकाच्या जीवासाठी माऊलीने स्वतःची किडनी देत त्याचे प्राण वाचवले. शहरातील जळोची येथील आईने हे दातृत्व दाखवत आईपेक्षा अपार माया या जगात कोणीही करू शकत नसल्याचे दाखवून दिले. जळोची येथील हनुमंत भाऊ सुळ (वय 27) हे गेल्या 1 वर्षापासून दोन्ही किडन्या निकामी झाल्याने त्रस्त होते. आजार बळावत असल्याने त्यांनी अनेक ठिकाणी किडनी मिळेल का याचा शोध घेतला. परंतु किडनी उपलब्ध झाली नाही. मुलाचा आजार बळावत असल्याचे आईला पाहवत नव्हते. अखेर हनुमंत यांची आई शालन (वय 54) यांनी स्वतःची किडनी मुलाला देण्याचा निर्णय घेतला.

संबंधित बातम्या :

हनुमंत यांच्या वडिलांचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले आहे. घरी बघणारे कोणी नाही. हनुमंतचा भाऊ अविनाश सुळ यांनी गावातील अ‍ॅड. अमोल सातकर यांची मदत घेतली. या दोघांनी पुढील उपचार व किडनी बदलण्यााठी दोन्ही माय-लेकरांना घेऊन तामिळनाडूतील कोईम्बुतर येथील खासगी रुग्णालय गाठले. तिथे संपूर्ण चाचण्या करून घेतल्या. शुक्रवारी (दि. 13) किडनी बदलण्याची ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. त्यामुळे हनुमंत यांचे प्राण वाचले. दोघांचीही प्रकृती आता उत्तम असल्याची माहिती अ‍ॅड. सातकर यांनी दिली. या शस्त्रक्रियेसाठी सुळ कुटुंबाला सुमारे 15 लाख रुपयांचा खर्च आला. शासनाकडून काही मदत झाली, तर या कुटुंबाला मोठा आधार मिळेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

Back to top button