पुणे-सोलापूर महामार्गावर जागोजागी खड्डे | पुढारी

पुणे-सोलापूर महामार्गावर जागोजागी खड्डे

पळसदेव : पुढारी वृत्तसेवा : पुणे-सोलापूर महामार्गावरील इंदापूर ते भिगवण हे 40 किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी, हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला असून, जीवघेण्या अपघातास निमंत्रण देत आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अतिशय वर्दळीचा महामार्ग आहे. या महामार्गावरून दररोज अवजड माल वाहतूक करणारे व इतर हजारो छोट्या-मोठ्या वाहनांची वाहतूक होते. मात्र, मध्यंतरी झालेल्या दमदार पावसामुळे इंदापूर, पळसदेव, काळेवाडी ते भिगवण अशा 40 किलोमीटर अंतरात अनेक छोटे-मोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकविताना किंवा रात्री-अपरात्री अचानक वाहन त्यात आपटल्यामुळे झालेल्या अपघातात अनेकांना किरकोळ व गंभीर जखमा झाल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी ठिगळे देऊन मलमपट्टी करण्याचे काम करण्यात आले होते. तरीदेखील रस्त्यावर खड्डे पडून परिस्थिती ’जेसे थे’ झाली आहे. यामुळे नेहमीच टोल वसुली करण्यात मग्न असलेले महामार्ग प्राधिकरण विभाग हे खड्डे कधी बुजवणार ? का मोठा अपघात घडल्यावर आणि अनेकांचे जीव गेल्यानंतर खड्डे बुजवण्यास सुरुवात करणार आहे, असा प्रश्न येथील प्रवासी व वाहनचालकांमधून विचारला जात आहे.

Back to top button