पुण्यातील नाईट क्लबवरील कारवाई बड्या नेत्याने रोखली

पुण्यातील नाईट क्लबवरील कारवाई बड्या नेत्याने रोखली
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  कोरेगाव पार्क परिसरातील एका नामांकित नाईट क्लबवरील कारवाई राज्यातील एका बड्या नेत्यामुळे महापालिकेला रोखावी लागल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या पथकाला अर्धवट कारवाई सोडून परत फिरावे लागले. अनधिकृतरित्या चालविल्या जाणार्‍या या क्लबला थेट वाचविण्यासाठी एका मंत्र्याने हस्तक्षेप केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कोरेगाव पार्क, मुंढवा परिसरात मोठ्या प्रमाणात हॉटेल आणि नाईट क्लब उभे राहिले आहेत. यामधील अनेक क्लबमध्ये अनधिकृत बांधकामे केली आहेत. रात्री उशिरापर्यंत चालणार्‍या क्लबमुळे अनेक वेळा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या अनधिकृत क्लबच्या विरोधात महापालिकेकडे तक्रारी आल्या आहेत. त्यातच महापालिकेच्या नदी सुधारणा प्रकल्पाच्या कामात हे नाईट क्लब अडथळा ठरत असल्याने पालिकेच्या बांधकाम विभागाने शुक्रवारी येथील नाईट क्लबवर कारवाईचे नियोजन केले होते. त्यानुसार पालिकेच्या पथकाने प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली.

पहिल्या टप्प्यात ओरिला या क्लबवर कारवाई करण्यात आली. मात्र, त्या लगतच्या क्लबवर कारवाई सुरू करताच राज्यातील एका बड्या नेत्याने अधिकार्‍यांना ही कारवाई थांबविण्यास सांगितले. नेत्याच्या दादागिरीमुळे अखेर पालिकेच्या संबंधित कर्मचार्‍यांना कारवाई थांबवावी लागली. या नेत्याने थांबविलेल्या कारवाईची पालिका वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
याबाबत महापालिकेच्या अधिकार्‍यांनी असा प्रकार घडलाच नसल्याचा दावा केला आहे. मात्र, एकीकडे आजच्या तरुणाईला नशेच्या मार्गाला लावणार्‍या या नाईट क्लबला वाचविण्यासाठी थेट मंत्रिपदावरील नेत्याला या क्लब चालकाने नक्की कसले 'पाणी' पाजले असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

कारवाई रोखण्यासाठी तृतीयपंथींचा अडथळा

कोरेगाव पार्क परिसरातील नाईट क्लब कारवाई रोखण्यासाठी चक्क तृतीयपंथींना आणून त्यांच्या माध्यमातून विरोध केला गेला. या भागातील एका माजी नगरसेविकेच्या मुलाने या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांचा बंदोबस्त मिळाला नाही
नाईट क्लबवरील कारवाईसाठी महापालिकेने पोलिसांकडून बंदोबस्त मागितला होता. मात्र, पोलिसांनी इतर ठिकाणाच्या बंदोबस्ताचे कारण देत या कारवाईसाठी बंदोबस्त दिला नाही. त्यामुळे पोलिस नसतानाही कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news