चारचाकी वाहतुकीतून रेल्वेला मिळाले 55 कोटी | पुढारी

चारचाकी वाहतुकीतून रेल्वेला मिळाले 55 कोटी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड शहरामधून रेल्वेच्या उत्पन्नात प्रवाशी वाहतुकीद्वारे मोठी भर पडत असली तरीही येथील मालवाहतुकीने देखील रेल्वेला मोठे उत्पन्न प्राप्त करून दिले आहे. गेल्या नऊ महिन्यांत चिंचवडच्या मालधक्क्यामधून चारचाकी वाहनांच्या झालेल्या वाहतुकीद्वारे रेल्वेला एकूण 54.83 कोटी रुपयांचे भरघोस उत्पन्न मिळाले आहे. औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात चारचाकी वाहनांची निर्मिती करणार्या अनेक मोठ-मोठ्या कंपन्या आहेत. यामधून दिवसाला हजारोंच्या संख्येने वाहनांची निर्मिती केली जाते. या वाहनांना देशभरात तसेच विदेशातही मोठी मागणी आहे. देशाच्या कानाकोपर्यात रेल्वेद्वारे हि उत्पादने पोहोचविली जात आहेत. यामधून रेल्वेच्या उत्पन्नात मोठी भर पडत असली तरी पुणे विभागात सर्वाधिक वाहनांची वाहतूक हि चिंचवड येथून होत असल्याची माहिती समोर आली आहे.

चिंचवड मालधक्क्यामधून सर्वाधिक वाहनांची वाहतूक
पुणे विभागातील खडकी, चिंचवड, मिरज आणि लोणी येथील मालधक्क्यामधून चारचाकी वाहनांची वाहतूक केली जाते. यांपैकी चिंचवड स्थानकामधून सर्वाधिक वाहनांची वाहतूक होत असून, एकुण वाहनांपैकी 75 टक्के वाहने हे चिंचवड मालधक्क्यातील आहेत.

नऊ महिन्यांत रेल्वेच्या 290 फेर्‍या
यावर्षीच्या पहिल्या नऊ महिन्यांत चारचाकीच्या वाहतुकीसाठी रेल्वेच्या एकूण 290 फेर्‍या झाल्या असून, याद्वारे रेल्वेला एकूण 54 कोटी 83 लाख 28 हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. दर महिन्याला चिंचवड स्थानकामधून चाळीस मालगाड्यांद्वारे वाहतूक झाल्याची माहिती समोर आली आहे.

या राज्यात वाहनांची सर्वाधिक निर्यात
चिंचवड येथील मालधक्क्यामधून रेल्वेद्वारे बिहार, दिल्ली, आसाम, झारखंड, तेलंगणा व आंध्र प्रदेश आदी राज्यांमध्ये सर्वाधिक वाहनांची निर्यात केली जात आहे.

रेल्वेद्वारे या कंपन्यांच्या उत्पादनाची वाहतूक
महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स व मारुती उद्योग आदी ऑटोमोबाईल कंपन्या मध्य रेल्वेचे प्रमुख ग्राहक आहेत. या कंपन्या नियमितपणे आपल्या उत्पादक वाहनांची वाहतूक रेल्वेद्वारे करत आहेत.

शहरामधून उत्पन्न अफाट मात्र सेवा प्रलंबित
पिंपरी व चिंचवड आदी रेल्वे स्थानकांमधून मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणात प्रवाशी वाहतूक होते. याद्वारे रेल्वेला मोठे उत्पन्नदेखील मिळत आहे. मात्र, तरीही या मार्गावरील काही गाड्या रद्द केल्या तर काही विलंबाने धावतात. याकारणाने प्रवाशांची गैरसोय होत आहे. मात्र, यावरील उपाय म्हणजे रेल्वेच्या प्रलंबित असलेल्या तिसर्‍या आणि चवथ्या लाईन होय. यांच्या निर्मितीमुळे हा प्रश्न सुटणार आहे; परंतु तरीही शहरातील प्रवाशांना या निर्णयाची वाट पाहावी लागत आहे.

औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरामधून मोठ्या प्रमाणात उत्पादित वाहनांच्या वाहतुकीद्वारे रेल्वेच्या उत्पन्नात भर पडत आहे. शहरातील प्रवाशांच्या द़ृष्टीने पुणे-मुंबई मार्गातील गाड्यांचे बोगी वाढविण्यात आले आहेत. तसेच तिसर्‍या लाईनचे काम अद्यापही प्रस्तावित आहे. त्याबाबत काही दिवसांत वरिष्ठ निर्णय घेणार आहेत.
                                 – डॉ. रामदास भिसे, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग.

Back to top button