नाटके उरली वीकेंडपुरतीच ! व्यावसायिक प्रयोग घटले | पुढारी

नाटके उरली वीकेंडपुरतीच ! व्यावसायिक प्रयोग घटले

सुवर्णा चव्हाण

पुणे : पूर्वी सोमवार ते रविवार नाटक पाहायला मिळायचे…वेगवेगळ्या नाट्यगृहांमध्ये कधी दुपारी, तर कधी रात्री नाटकाची मेजवानी सांस्कृतिक पुण्यात पुणेकरांना मिळत होती…पण, आता नाटकाच्या व्यवस्थापनाचा खर्च वाढल्यामुळे नाटके फक्त वीकेंडपुरतीच मर्यादित होत आहेत. नाटक करणे महागल्यामुळे नाट्यनिर्मात्यांकडून रंगभूमीवर येणार्‍या नवीन व्यावसायिक नाटकांची संख्या कमी झाली आहे.
 कोरोनामुळे रंगभूमीला आलेली मरगळ, निर्मात्यांचे झालेले नुकसान आणि महागलेला खर्च यामुळे नाट्यनिर्माते अजूनही आर्थिक घडीने सावरलेले नाहीत.
त्यात नाट्यगृहांच्या भाड्यापासून ते प्रसिद्धीपर्यंत…अशा विविध खर्चांत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे नाट्यनिर्मात्यांसाठी  नाटक करणे  खर्चीक बाब बनली आहे. एका प्रयोगासाठी 70 हजार ते 1 लाखांचा खर्च, तर दौर्‍यांमधील एका प्रयोगासाठी दीड ते दोन लाखांचा खर्च नाट्यनिर्मात्यांना परवडणारा नसल्यामुळे सध्या नाट्य प्रयोगांची संख्याही घटली आहे. खर्च वाढल्यामुळे काही व्यावसायिकांनी दौरे करणे  कमी केले आहे. नाट्य व्यवस्थापनाचा खर्च अव्वाच्या सव्वा असल्याने नवीन नाटक रंगभूमीवर आणण्यासाठीची जोखीम निर्माते पत्करत नसल्याचे दिसून येत आहे. पुण्यातही हेच चित्र असून, शहरात होणार्‍या नाट्यप्रयोगांची संख्या कमी झाली आहे.
 नाट्य व्यवस्थापक मोहन कुलकर्णी म्हणाले, ’नाटक करणे नाट्यनिर्मात्यांना परवडणारे नाहीच. त्यामुळेच प्रयोगांची संख्या घटली असली, तरी नाट्यनिर्मात्यांना नाटक करण्याशिवाय पर्याय नाही. मुंबई, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, धुळे, नाशिक आदी जिल्ह्यांमध्ये नाटक करणे खर्चीक आहे. दौरे करणे निर्मात्यांसाठी परवडणारे नाही. पण, नाटक करणे नाट्यनिर्मात्यांनी  थांबवलेले नाही. ते जोखीम पत्करून नाटक करतच आहेत, ही खूप चांगली गोष्ट आहे.’
वाढलेल्या खर्चामुळे अनेक नाट्यनिर्मात्यांनी नाटकांच्या प्रयोगांची संख्या कमी केली असून, पुण्यात तर फक्त शनिवारी आणि रविवारी म्हणजेच विकेंडलाच नाट्यप्रयोग होत आहेत. कलाकारांचे मानधन, पडद्यामागील कलाकारांचे मानधन, प्रसिद्धीचा खर्च, नाट्यगृहाचे भाडे, वाहतुकीचा खर्च..असे विविध खर्च वाढल्यामुळे निर्मात्यांना नाटक करणे परवडणारे नाही. त्यामुळे नाटकाचा खर्च कमी होऊन रंगभूमीवर जुने दिवस यावेत, अशी आस कलाकारांना आहे.
                                                                                                    – दीपक रेगे, ज्येष्ठ रंगकर्मी.
एका प्रयोगाचा खर्च करणे आम्हा निर्मात्यांना परवडणारा नाहीच. नाटकांचे दौरे करणेही महागले आहे. वाहतुकीच्या खर्चापासून ते कलाकारांच्या मानधनापर्यंतचा खर्च वाढला आहे. दौर्‍यामध्ये एका प्रयोगासाठी 2 लाखांपर्यंतचा खर्च करावा लागत आहे, त्यामुळे नाटकांचे दौरे करतानाही आम्हाला विचार करावा लागतो. जोखीम पत्करून निर्माते प्रयोग करत आहेत. 
                                                                                    – राहुल भंडारे, नाट्यनिर्माता.
असा येतो एका नाट्य प्रयोगासाठी खर्च (अंदाजे)
नाट्यगृहाचे भाडे : 5 ते 6 हजार
कलाकारांचे मानधन : 20 ते 30 हजार
प्रसिद्धीचा खर्च : 10 ते 15 हजार
इतर खर्च : 20 ते 25 हजार
एकूण खर्च : 70 हजार ते 1 लाख (नाट्यनिर्माता किंवा संस्थेप्रमाणे खर्च वेगवेगळा असू शकतो)
दौर्‍यांचा खर्च (एका नाट्य प्रयोगासाठी अंदाजे)
नाट्यगृहाचे भाडे : 5 ते 30 हजार
कलाकारांचे मानधन : 20 ते 40 हजार
वाहतुकीचा खर्च : 20 ते 25 हजार
प्रसिद्धीचा खर्च : 30 ते 40 हजार
निवास आणि भोजन : 20 ते 30 हजार
इतर खर्च : 40 ते 50 हजार
एकूण खर्च : दीड ते 2 लाखांपर्यंत (नाट्यनिर्माता किंवा संस्थेप्रमाणे खर्च वेगवेगळा असू शकतो)

Back to top button