मिलिसेकंद पल्सार ग्रहणांचे उलगडले गूढ

मिलिसेकंद पल्सार ग्रहणांचे उलगडले गूढ

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : कॉम्पॅक्ट बायनरी सिस्टिममधील मिलिसेकंद पल्सारच्या ग्रहण यंत्रणेचा शोध घेण्यात पुण्यातील राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रातील (एनसीआरए) शास्त्रज्ञांच्या गटाला यश आले आहे. अद्ययावत जायंट मीटरवेव्ह रेडिओ दुर्बिणीचा वापर करून हे संशोधन करण्यात आले. 1980 पासून मिलिसेकंद पल्सार मधील ग्रहण ज्ञात असूनही ग्रहणांचे नेमके कारण समजलेले नव्हते. मात्र, या संशोधनामुळे आता ती उणीव दूर होऊ शकणार आहे.

'एनसीआरए'मधील डॉ. भास्वती भट्टाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या संशोधनात देवज्योती कंसबनीक, डॉ. जयंता रॉय आणि द युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टरमधील प्रा. बेंजामिन स्टॅपर्स यांचा सहभाग आहे. स्ट्रोफिजिकल जर्नल या आंतरराष्ट्रीय संशोधनपत्रिकेत या बाबतचे संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले.

या संशोधनात जीएमआरटीद्वारेच 2013 मध्ये शोधल्या गेलेल्या जे 1544 + 4937 या स्पायडर मिलिसेकंद पल्सारचे अद्ययावत जीएमआरटीद्वारे 300 ते 850 मेगाहर्ट्झ दरम्यानच्या रेडिओ लहरींवर निरीक्षण करण्यात आले. अद्ययावत जीएमआरटीच्या संवेदनशीलतेमुळे शास्त्रज्ञांना रेडिओ लहरींवर ग्रहण कसे अवलंबून आहे, ग्रहणात जाऊन बाहेर येण्यातील पल्सारचे संक्रमण याच्या नोंदी घेणे शक्य झाले.

संशोधनाबाबत शास्त्रज्ञ देवज्योती कंसबनीक म्हणाले, स्पायडर मिलिसेकंद पल्सारसाठी ग्रहणाची यंत्रणा पहिल्यांदाच स्पष्टपणे ठरवण्यात आली आहे. पल्सारमधून रेडिओ उत्सर्जनाचे अपवर्तन, विखुरणे आणि सोबतच्या तार्‍यातून बाहेर पडलेल्या पदार्थांद्वारे विविध प्रकारे शोषल्या जाण्यासारख्या अनेक संभाव्य यंत्रणा असल्याचे दिसून आले आहे.

उत्क्रांती प्रक्रियेचा आणखी उलगडा होणार

निसर्गाची सर्वोत्कृष्ट घड्याळे, मिलिसेकंद पल्सार (एमएसपी) हे अल्ट्रा-डेन्स मृत तारे आहेत. ते एका सेकंदात काहीशे वेळा रेडीओ प्रकाशाच्या नियतकालिक फ्लॅश पाठवणार्‍या आकाशीय दीपगृहांसारखे कार्य करतात. मिलिसेकंद पल्सारमध्ये अनेकदा कक्षीय सोबती असतात.

काही मिलिसेकंद पल्सार प्रणालीत पल्सार आणि सोबतीचा तारा यांच्यातील विभाजन पृथ्वी आणि चंद्रातील तुलना करता येण्याजोगे असते. ते एकमेकांशी संवाद साधतात. पल्सारमधील किरणोत्सर्गामुळे सोबतीच्या तार्‍यातील सामग्री कमी होऊन उडून जाऊ शकते. तसेच ही पसरलेली सामग्री पल्सारद्वारे उत्सर्जित रेडिओ पल्सला ग्रहण लावू शकते.

कमी रेडिओ फ्रिक्वेन्सी पल्सला ग्रहण लागते, तर उच्च रेडिओ फ्रिक्वेन्सीला ग्रहण लागत नाही. हे कोणत्या यंत्रणेमुळे होते, याबाबतची माहिती यापूर्वी सिद्ध झालेली नाही. या स्पायडर मिलिसेकंद पल्सारची ग्रहण यंत्रणा आणि भौतिक गुणधर्म समजून घेतल्याने उत्क्रांतीच्या प्रक्रियेबाबतचा अधिक उलगडा भविष्यात होऊ शकेल, असे शास्त्रज्ञांना वाटते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news