पुण्यात 6 हजार झाडांच्या बदल्यात 65 हजार झाडे लावणार ; महापालिका प्रशासनाची ग्वाही

पुण्यात 6 हजार झाडांच्या बदल्यात 65 हजार झाडे लावणार ; महापालिका प्रशासनाची ग्वाही

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या मुळा-मुठा नदीकाठ सुधारणा प्रकल्पाच्या पहिल्या दोन टप्प्यांतील कामांसाठी तब्बल 6 हजारांहून अधिक वृक्षांवर कुर्‍हाड कोसळणार असल्याचे वृत्त दैनिक 'पुढारी'ने 16 मार्च रोजी प्रसिद्ध केले. या वृत्तानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने बाधित वृक्षांच्या बदल्यात 65 हजार वृक्ष लावण्याची ग्वाही प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. नदी पुनरुज्जीवन योजनेतून वाहणार्‍या मुळा-मुठा नदीकाठ सुशोभीकरणाचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे. पाच हजार कोटींचा हा प्रकल्प 11 टप्प्यांमध्ये केला जाणार आहे.

त्यातील संगमवाडी ते येरवडा आणि येरवडा ते मुंढवा, असे काम सुरू आहे. प्रकल्पाच्या आराखड्यात (डीपीआर) वृक्ष तोड होणार नाही, असे सांगितले होते. मात्र, प्रकल्पाच्या खोदाईत आणि बांधकामात अडथळा ठरणारे 3 हजार 249 वृक्ष पूर्णत: काढण्याचा, तसेच 2 हजार 813 वृक्ष काढून त्यांचे पुनर्रोपण करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनानेच वृक्षसंवर्धन समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे. यासंदर्भात दैनिक 'पुढारी'ने सर्वप्रथम वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पर्यावरणप्रेमींसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विरोध दर्शविला. खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी 'पुढारी'च्या वृत्ताचा दाखला देत सरकारला जाब विचारले. या सर्व पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने बाधित वृक्षांच्या बदल्यात स्थानिक प्रजातीच्या 65 हजारांपेक्षा जास्त वृक्षांचे रोपण तसेच मोठ्या प्रमाणात नदीच्या दोन्ही काठांवर झुडपाची लागवड करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

नागरिकांच्या हरकती मागविल्या
प्रकल्पामुळे बाधित होणार्‍या वृक्षांची पाहणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गठित केलेल्या वृक्षतज्ज्ञ समितीमार्फत प्रत्यक्ष जागेवर जाऊन करण्यात आलेली आहे. वर्तमानपत्रातील जाहीर प्रकटनानुसार नागरिकांना याबाबत हरकती घेण्यास 1 मार्च ते 13 मार्च 2023 पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार काही नागरिकांनी यावर हरकती घेतल्या असून, त्यावर सुनावणी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर प्रस्ताव महाराष्ट्र वृक्ष प्राधिकरण यांच्याकडे मान्यतेसाठी पाठविला जाणार असल्याचेही महापालिकेने सांगितले आहे.

झाडांच्या कत्तलींची कबुलीच
प्रकल्प आराखड्यामध्ये वृक्षांची कत्तल होणार नाही, अशी ग्वाही देणार्‍या महापालिकेने बाधित वृक्षांच्या बदल्यात 65 हजार वृक्ष लावण्याची घोषणा केल्याने प्रकल्पासाठी वृक्षांची कत्तल होणार, याची एकप्रकारे कबुलीच दिली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news