Pimpari News : एमबीबीएस अ‍ॅडमिशनच्या बहाण्याने 2 कोटींचा गंडा | पुढारी

Pimpari News : एमबीबीएस अ‍ॅडमिशनच्या बहाण्याने 2 कोटींचा गंडा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : एमबीबीएसला अ‍ॅडमिशन करून देण्याचे आमिष दाखवून आठ जणांकडून तब्बल दोन कोटीहून अधिक रूपये वसूल करून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. ही घटना एक ते 30 सप्टेंबर याकालावधीत हिंजवडी येथे घडली. या प्रकरणी नितीन शिवाजी ढवाण (41, जळोची, ता. बारामती) यांनी शनिवारी (दि. 30) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी सिद्धार्थ रावत उर्फ शुभम सिंग जयबहादूर सिंग, विजेंद्र वर्मा यांसह एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी हिंजवडीमध्ये कार्यालय सुरु केले होते. त्यांनी एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी सांगलीतील प्रकाश पाटील मेडिकल कॉलेज, जळगावमधील उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, धुळेतील एसपीपीएम मेडिकल कॉलेज आणि पुण्यातील अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज येथे प्रथम वर्षासाठी प्रवेश मिळवून देतो, असे अमिष दाखवले. त्याद्वारे हनुमंत भोसले (रा. ठाणे) यांनी 17 लाख 15 हजार रुपये, बाळकृष्ण मोहन पिंगळे (रा. बारामती) यांनी 28 लाख 50 हजार, मेघना मलिक (रा. पिंपळे सौदागर, पुणे) यांनी 13 लाख, दीपक यादव (रा. सोलापूर) यांनी 15 लाख, नवी मुंबईतील किशोर पाटील यांनी 38 लाख, तर कैलास काळे यांनी 40 लाख 80 हजार, वर्धा येथील विनोद तेलंग यांनी 20 लाख आणि फिर्यादी नितीन ढवणे यांनी 28 लाख 9 हजार 500 रुपये आरोपींना दिले.

पैसे घेतल्यानंतर प्रवेश झाल्याची खोटी यादी दाखवली. मात्र, प्रत्यक्षात प्रवेश मिळालेच नव्हते. त्यामुळे फिर्यादी यांनी संपर्क साधला असता आरोपींचा फोन बंद दाखवत होता. तसेच हिंजवडीमधील कार्यालय देखील बंद असल्याचे आढळून आले. यावरून त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

Back to top button