सात वर्षांतून एकदाच येणारी कारवी फुलली

सात वर्षांतून एकदाच येणारी कारवी फुलली

मंचर : सात वर्षांतून एकदाच फुले येणारी कारवी ही वनस्पती उत्तर पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर अभयारण्य व निसर्गरम्य आहुपे खोर्‍यात या वर्षी फुललेली पाहायला मिळत आहे. फुललेली कारवी पाहण्यासाठी निसर्गप्रेमी गर्दी करीत आहेत. कारवी हे भारताच्या पश्चिम घाटात आढळणारे झुडूप आहे. पश्चिम घाटातील भीमाशंकर व आहुपे परिसरातील हिरव्यागार डोंगरावर जांभळ्या रंगाच्या कारवीच्या फुलांचे ताटवे आता दिसू लागले आहेत. या वनस्पतीचे वैशिष्ट्य म्हणजे कारवी ही वनस्पती सात वर्षांतून एकदाच फुलते. त्यामुळे वनस्पती अभ्यासकांमध्ये या वनस्पतीचे विशेष आकर्षण आणि कुतूहल आहे.

कारवी या वनस्पतीचा जीवनकाळ हा फक्त आठ वर्षांचा असतो. त्यामुळे कारवी आयुष्यात एकदाच फुलते. फुलांनंतर ही वनस्पती फळांनी भरलेली असते, जी पूर्णपणे सुकायला एक वर्ष घेते. पुढील मान्सूनच्या आगमनाने ही फळे जमिनीवर पडतात अन् याचे बियाणे उगविण्यासाठीची प्रक्रिया पुन्हा सुरू होते. त्यामुळे दर सात वर्षांनी कारवी फुललेली दिसेल.

कारवी बहुपयोगी
कारवी वनस्पतीचे औषधी उपयोग आहेत, तर याच्या बारीक फांद्या आदिवासी लोक घराचे छप्पर बनविण्यासाठी वापरतात. शेतीकामातही कारवीच्या फांद्यांचा पिकांना आधार देण्यासाठी उपयोग होतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news