

पुणे; पुढारी वृत्तसेवा : MSRTC Strike : एसटीच्या पुणे विभागातील कर्मचार्यांनी रविवारी रात्री 12 नंतर बंदची हाक दिल्यामुळे सोमवारी एसटीच्या पुणे विभागाला 60 लाखांचा फटका बसला आहे. तर दैनंदिन एसटीने प्रवास करणार्या 1 लाख 20 हजार प्रवाशांची विविध ठिकाणी प्रवास करण्यासाठी मोठी फरफट झाली. तर सोमवारी नियोजित 1600 च्या घरात फेर्या रद्द झाल्या.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागात 13 डेपो आहेत. या डेपोंच्या मार्फत प्रवाशांना सारवजनिक वाहतूक सेवा पुरविली जाते. मात्र, एसटी कर्मचार्यांनी सोमवारी प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. प्रवाशांना झालेल्या त्रासासोबतच एसटी महामंडळाचे सुध्दा मोठे नुकसान झाले. 13 डेपोंमार्फत मिळणारे 60 लाखांचे एकदिवसीय उत्पन्न एसटीला गमवावे लागले. तर 1 लाख 20 हजार प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागला.
ऑनलाईन तिकीटे झाली रद्द
बहुतांश प्रवाशांनी सोमवारी नियोजित प्रवासासाठी ऑनलाईन पध्दतीने तिकीट बुकींग केली होती. मात्र, एसटीची गाडीच उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांची ही काढलेली तिकीटे सोमवारी रद्द करण्यात आली. एसटीकडून याचे रिफंड प्रवाशांना देण्यात येणार आहे. मात्र, प्रवाशांना सोमवारी खासगी ट्रॅव्हल्सची नव्याने अव्वाच्या सव्वा दरात तिकीटे काढावी लागली. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप झाला.
स्वारगेट एसटी स्थानकाचे दैनंदिन उत्पन्न – 26 ते 28 लाख
दैनंदिन प्रवासी संख्या – 30 हजार
स्वारगेट डेपोच्या गाड्या – 110 एसटी बस (शिवनेरी, लालपरी, शिवशाही)
दैनंदिन रद्द झालेल्या फेर्या – 1000 ते 1200
शिवाजीनगर एसटी स्थानकाचे दैनंदिन उत्पन्न – 30 ते 35 लाख
दैनंदिन प्रवासी संख्या – 25 ते 30 हजार
स्वारगेट डेपोच्या गाड्या – 162 एसटी बस (शिवनेरी, लालपरी, शिवशाही)
दैनंदिन रद्द झालेल्या फेर्या – 325 ते 750
स्वारगेट, शिवाजीनगर (वाकडेवाडी), पुणे स्टेशन, पिंपरी, राजगुरूनगर, नारायणगाव, भोर, शिरूर, इंदापूर, बारामती, बारामती एमआयडीसी, सासवड, दौंड हे पुणे विभागातील सर्वच्या सर्व डेपो सोमवारी बंद होते.
एसटीच्या संपामुळे पुणे विभागाला 60 लाखांचा फटका बसला आहे. दैनंदिन होणार्या 1 हजार 600 फेर्या रद्द झाल्या आहेत. विभागातील 13 डेपो संपामुळे बंद होते. त्यामुळे नियमित प्रवास करणारे 1 लाख 20 हजार प्रवाशांना प्रवासासाठी पर्यायी वाहनाचा शोध घ्यावा लागला आहे.
– ज्ञानेश्वर रणनवरे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी पुणे विभाग