पारगाव : धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद | पुढारी

पारगाव : धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

पारगाव(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : नागापूर येथील मिंडे वस्तीत धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर शनिवारी (दि. २३) सायंकाळी जेरबंद झाला. यामुळे वनविभाग व स्थानिक शेतकर्‍यांनी सुटकेचा निश्वास सोडला. नागापूर गावातील मिंडे वस्ती, गडदे वस्तीत गेल्या दोन महीन्यांपासून बिबट्याने अक्षरक्षः धुमाकूळ घातला होता. गडदे वस्ती येथिल एकनाथ शंकर वाघ या शेतकऱ्याच्या तीन शेळ्या बिबट्याने गोठ्यात घुसून ठार केल्या होत्या.

त्यानंतर दुसऱ्या दिवशीच मिंडे वस्तीत रात्रीच्या वेळी कांचन तेजस मिंडे हे रस्त्याने जात असताना त्यांच्यासोबत चाललेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून कुत्र्याला जागीच ठार केले होते. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा याच वस्तीत सोमनाथ मच्छिंद्र मिंडे हे वीजपंप सुरु करण्यासाठी रात्रीच्या वेळी गेले असता शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार केले होते. या परिसरात बिबट्याची दहशत वाढतच चालली होती. त्यामुळे शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण पसरले होते.

येथील शेतकरी विजय चासकर यांनी वन विभागाला पिंजरा लावण्यासाठी पाठपुरावा केला. अखेर शुक्रवारी (दि. १५) वनविभागाने पिंजरा लावला. परंतु बिबट्या जेरबंद होत नव्हता. वनविभागाने दोन ते तीन जागा बदलून देखिल पिंजरा लावला. त्यानंतर नंदू शत्रुघ्न पोहकर यांच्या शेतात शनिवारी (दि. २३) सकाळी पिंजरा लावला. सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला. जेरबंद झालेला बिबट्या पूर्ण वाढ झालेला असून त्याला माणिकडोह (ता. जुन्नर) येथिल बिबट निवारा केंद्रात हलवले आहे.

हेही वाचा

‘पंचगंगेच्या हक्का’साठी पुढाकाराची गरज

Pune Ganeshotsav 2023 : महिलांच्या ढोल-ताशा पथकांचे वादन ठरतेय लक्षवेधी

चीनमधील हाँगझोऊ शहरात रंगणार स्पर्धा

Back to top button