लम्पी घातक नसून उपाय करणे गरजेचे | पुढारी

लम्पी घातक नसून उपाय करणे गरजेचे

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  लम्पी आजाराविषयी शेतकर्‍यांनी वेळीच सतर्क होणे गरजेचे आहे. योग्य वेळी उपाययोजना केल्या आणि काळजी घेतली तर या रोगाचा प्रादुर्भाव रोखणे शक्य आहे. याबाबत बारामती कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. धीरज शिंदे व पशुशास्त्र विभागाचे विशेषज्ञ डॉ. रतन जाधव यांनी सूचविलेले काही विशेष खबरदारीचे उपाय.

1. प्रसारकाचा बंदोबस्त : लम्पी रोगाचा प्रसार प्रामुख्याने रक्त पिणार्‍या कीटकांद्वारे होतो. जसे की, माश्या (चावणार्‍या स्टोमोक्सीस व क्युलीकवाइड माशी), गोचीड, पिसवा आणि डास, इत्यादी. त्यामुळे संक्रमणाचा धोका कमी करण्यासाठी कीटक नियंत्रण उपाय लागू करणे गरजेचे ठरते. गुरे-ढोरे राहण्याच्या ठिकाणी फ्लाय रिपेलेंट्स, कीटकनाशके आणि कीटक-प्रतिरोधक स्क्रीन वापराव्यात. गोठ्यात डास, चावणारी माशा यांचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी लिंबाची पाने जाळून धूर केल्यास फायदा होतो.
2. गोठ्यात घ्यावयाची काळजी : गोठ्यातील खड्डे, भेगा चुन्याने भरून घ्याव्यात. चुन्याची धुरळणी करावी. 2 ते 3 टक्के सोडियम हायड्रोक्लोराईडचे द्रावण फवारून गोठ्याचे निर्जंतुकीकरण करावे. तसेच, निरोगी जनावरांच्या अंगावर किडे न चावण्यासाठी औषध लावावे व गोठ्यामध्ये यासाठीच्या औषधांची फवारणी करून घ्यावी.
3. तपशीलवार नोंदी ठेवणे : जनावरांचे आरोग्य, लसीकरण इतिहास आणि लम्पीशी संबंधित कोणत्याही घटनांच्या अचूक नोंदी ठेवणे गरजेचे आहे. जनावरांचा विमा काढलेला असावा.
4. लसीकरण : लम्पी टाळण्यासाठी प्रभावी मार्ग म्हणजे लसीकरण होय. गोठ्यातील जनावरांचे लसीकरण करण्यासाठी पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. सर्व प्राण्यांचे लसीकरण करून घ्यावे.
5. प्राथमिक उपचार : पशुपालकांनी जनावरांना लक्षणे आढळताच पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून उपचार करून घ्यावेत. त्वचेवरील गाठीचे जखमेत रूपांतर झाल्यास जखमेत जंतू पडू नये यासाठी पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार औषध उपचार करून घ्यावेत. तसेच लम्पी या त्वचारोग नियंत्रणासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने गोट पॉक्स या लसीचे लसीकरण करून घ्यावे.
6. मृत प्राण्याची योग्य विल्हेवाट : एखादा प्राणी मृत्यू पावल्यास त्याची योग्य विल्हेवाट लावावी. असे न केल्यास मृताच्या शरीरावर बसणार्‍या माश्या व किडी या रोगांच्या प्रसारास कारक ठरू शकतात. त्यामुळे, आजाराने मृत झालेल्या जनावरास खोल जमिनीत पुरून त्यांच्या शरीराची विल्हेवाट लावावी. ते उघड्यावर टाकू नयेत.

लम्पी हा संसर्गजन्य रोग आहे. त्याला आळा घालण्यासाठी सामूहिक जनजागर आणि चळवळ उभी राहणे गरजेची आहे. सध्याची देशातील पावसाची स्थिती पाहता लवकरच जनावरांसाठी चारा छावण्या उभ्या कराव्या लागतील. अशा वेळी परिस्थिती आणखी भीषण होऊ शकते.
                 – डॉ. धीरज शिंदे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र, बारामती.

Back to top button