वालचंदनगर : पुढारी वृत्तसेवा : गेल्या 25 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या इंदापूर नगरपरिषदेतील स्वच्छता विभागाच्या 64 कामगारांच्या कायम नियुक्तीचा प्रश्न अखेर मार्गी लागला. आमदार दत्तात्रय भरणे यांनी मंत्रालयस्तरावर हालचाली करून या कामगारांना न्याय दिला असून, याबाबत नगरविकास खात्याचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी अध्यादेश काढून कामगारांना कायम कामगार म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे कामगारांनी आमदार भरणेंना पेढे भरवून, त्यांचा सत्कार करून आनंदोत्सव साजरा केला. आमदार भरणे म्हणाले की, हे काम मी एकट्यानेच केले नाही. यासाठी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, भरत शहा यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी यांचे मोठे सहकार्य झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन-तीन बैठका झाल्या होत्या. परंतु, निर्णय होण्यास काही काळ गेला. मात्र, तुम्हाला न्याय मिळाला, यात मला आनंद आहे.
मी तुमच्यावर उपकार केले नाहीत, मी माझे कर्तव्य पार पाडले आहे. सर्वाधिक आनंद मला झाल्याचे सांगत तुमचा सख्खा मामा जसा तुमच्यासोबत आहे, तसा हा मामा तुमच्यासोबत राहील. गेल्या 25 वर्षांपासून आमचा प्रश्न प्रलंबित होता. आमची अडचण ओळखून आमदार दत्तात्रय भरणे यांनी तो प्रश्न सुलभतेने आणि तातडीने सोडविला आहे. आमच्या अडचणीच्या काळात भरणे यांनी आम्हाला मदत केली असून, आम्ही भरणेंना कायमस्वरूपी विसरणार नाही, अशी भावना नगरपरिषदेचे कर्मचारी सुरेश सोनवणे यांनी व्यक्त केली.
इंदापूर नगरपरिषदेला रस्त्यांसाठी 90 कोटी आणि गटार योजनेसाठी 60 कोटी असा एकूण 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. शहरात बाजारकट्टा, बगिचा यांसह इतर अनेक विकासकामे करणार असल्याचेही आमदार भरणे यांनी सांगितले.
हेही वाचा