खरीप हंगाम कोलमडल्याने बाजरीचे भाव गगनाला भिडणार

खोर : पुढारी वृत्तसेवा : या वर्षी खरिपाच्या हंगामासाठी अनुकूल वातावरण मिळाले नाही. यासह पावसाने साथ दिली नसल्याने शेतकरीवर्गाच्या खरीप हंगामाबाबत अपेक्षाभंग झाला आहे. खरीप हंगाम हा जून ते जुलैमध्ये घेतला जातो आणि ऑक्टोबर महिन्यात पीक काढले जाते. यालाच पावसाळी हंगामदेखील म्हणतात. मात्र, या वर्षी पाऊस न झाल्याने दौंड तालुक्यात कोठेही बाजरीच्या पिकाच्या पेरण्या करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे गत वर्षी खरीप हंगामातील मुख्य मानली जाणारी या वर्षीची नवीन बाजारी बाजारात येणार की नाही? असा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
या वर्षीची नवीन बाजरी बाजारात आली नाही, तर शेतकरी व ग्राहकांना प्रतिक्विंटल दराने मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. केडगाव येथील खरेदी-विक्री उपबाजारात आजमितीला बाजरी ही 2 हजार ते 2 हजार 600 रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री केली जात आहे. या वर्षी पाऊसच झाला नसल्याने केडगाव उपबाजार संघाला राजस्थान येथून 2 हजार 700 रुपये प्रतिक्विंटल दराने बाजारी आयात करावी लागणार आहे. खरिपाच्या हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, मका, कापूस, ऊस, हरभरा, भुईमूग, मूग, उडीद, चवळी, तीळ, गवार, भेंडी, सोयाबीन, रताळे ही पिकेदेखील अगदी नगण्य प्रमाणात घेण्यात आली आहेत.
एकीकडे खरीप हंगाम तर वाया गेला असून, आता रब्बीचा हंगाम सुरू होत आहे. हा हंगाम ऑक्टोबर ते डिसेंबर या महिन्यांदरम्यान असतो. या हंगामात ज्वारी हे प्रमुख पीक घेतले जात असून, त्याखालोखाल टोमॅटो, वांगी, फुलकोबी, पानकोबी, पालक, मेथी, कोथिंबीर, कांदा, लसूण आणि बटाटा ही रब्बी हंगामातील भाजीपाला पिके घेण्यात येत असतात. मात्र, पाऊसच नसला तर शेतकरी पेरणी कशी करणार? हा प्रश्नच आहे.