

कडूस(ता.खेड जि.पुणे) खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वाडा-कडूस गटाचे अजातशत्रू आदर्श माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकभाऊ शांताराम शेंडे (Ashok Shende) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
कडूस गावचे असलेले अशोकभाऊ शेंडे यांना सामाजिक कार्याची विशेष आवड, कडूस गावचे सरपंच म्हणून त्यांनी कार्यभार संभाळला होता तर मुंबई येथे कामगाराचे नेते म्हणून ते परिचीत होते. सरपंच असताना त्यांनी कडूस गावाला नव्या उंचीवर नेऊन ठेवले होते.
आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली. त्यांना वाडा कडूस गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा परिषदेची उमेदवारी देण्यात आली. जिल्हा परिषदेवर २०१२-१७ निवडून गेल्यावर त्यांनी या गटात मोठ्या प्रमाणात विकास केला. या कार्याची दखल घेत त्यांना आदर्श जिल्हा परिषद सदस्य पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते.
कडूस येथील एकता मित्र मंडळाच्या माध्यमातून तरुणांना एकत्र घेत त्यांनी उभारलेली सामूदायिक विवाहाची चळवळ अनेकांच्या जीवनात प्रकाश फुलवणारी होती. जिल्हा नियोजन समिती, जिल्हा कृषी समिती यांसह अन्य ठिकाणी त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली होती.