पुणे : बॉक्सिंग अ‍ॅकॅडमी बंद; खेळाडूंच्या सरावाचे वांदे!

पुणे : बॉक्सिंग अ‍ॅकॅडमी बंद; खेळाडूंच्या सरावाचे वांदे!

पुणे : पुणे महापालिकेच्या कै. बाबूराव सणस मैदानावर गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेली बॉक्सिंग अ‍ॅकॅडमी बंद करण्याबाबतचा आदेश मनपा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे सराव करणार्‍या बॉक्सिंग खेळाडूंचे नुकसान होणार असून, प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. सणस मैदानावर गेल्या दहा वर्षांपासून उमेश खाणेकर बॉक्सिंग अ‍ॅकॅडमी या नावाने खेळाडूंना सराव देणारी अ‍ॅकॅडमी सुरू आहे.

या बॉक्सिंग रिंगमधून अनेक आंतरशालेय, जिल्हास्तरीय, विभागीय आणि राज्यस्तरीय खेळाडू पुढे आलेले आहेत. बॉक्सिंग रिंगबरोबरच स्पोर्ट्स म्युझियमसाठी बांधलेल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये बॉक्सिंगचा सराव सुरू असतो. अनेक खेळाडू या ठिकाणी सायंकाळी रोज दोन सराव करीत आहेत. या दोन्ही जागांसाठी महापालिकेचे वार्षिक किमान शुल्क भरून परवानगी मिळण्याबाबत मनपा क्रीडा विभागाला निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र, हे निवेदन फेटाळण्यात आले असून, त्यामुळे अनेक बॉक्सिंगपटूंचे नुकसान होणार असल्याचे समोर येत आहे.

उमेश खाणेकर बॉक्सिंग अ‍ॅकॅडमी या नावाने गेल्या दहा वर्षांपासून सणस मैदानावर बॉक्सिंग रिंग चालू आहे. या ठिकाणी अनेक आंतरशालेय, जिल्हास्तरीय, विभागीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेते खेळाडू सराव करीत असतात. प्रशासनाकडे अ‍ॅकॅडमी चालविण्यासाठी भाडेतत्त्वावर अधिकृत परवानगी मागितलेली आहे. मात्र, प्रशासनाने सात दिवसांमध्ये अ‍ॅकॅडमी हलविण्यास सांगितले आहे. आम्ही पुन्हा एकदा प्रशासनाकडे परवानगी मिळण्यासाठी जाणार आहोत.

– उमेश खाणेकर,संचालक, उमेश खाणेकर बॉक्सिंग अ‍ॅकॅडमी

महापालिकेच्या सणस मैदानावर गेल्या दहा वर्षांपासून अनधिकृतपणे बॉक्सिंग अ‍ॅकॅडमी चालू आहे. त्यांनी परवानगी मागितलेली असली, तरी प्रथम त्यांना ती जागा खाली करावी लागणार आहे. जागा खाली करून दिल्यानंतर त्यांनी प्रशासनाकडे अर्ज करावा. या अर्जाची नक्कीच आम्ही दखल घेऊन योग्य तो निर्णय घेऊ.

– विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, पुणे मनपा

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news