रिमझिमने ‘खडकवासला’ची पातळी स्थिर

रिमझिमने ‘खडकवासला’ची पातळी स्थिर

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  तीन दिवसांच्या दमदार पावसानंतर रविवारी (दि. 10) सकाळपासून पानशेत, वरसगाव खोर्‍यात पावसाचा जोर ओसरला. असे असले तरी रिमझिमने खडकवासला धरणसाखळीतील पाण्याची पातळी स्थिर आहे. सायंकाळी 5 वाजता धरण साखळीत 27.34 टीएमसी म्हणजे 93.78 टक्के पाणीसाठा होता. रायगड जिल्ह्यालगतच्या पानशेत, वरसगाव खोर्‍यासह मुठा, सिंहगड भागात शुक्रवार (दि. 8) पासून लागोपाठ तीन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र, रविवार सकाळपासून उघडीप आहे. रिमझिमने ओढ्या-नाल्यांतून पाण्याचे मंद प्रवाह सुरू असल्याने धरणसाठ्यात किंचित भर पडत आहे.

सकाळी 6 ते सायंकाळी 5 पर्यंत वरसगाव येथे 2 मिलिमीटर, पानशेत येथे 1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर टेमघर व खडकवासलात मात्र उघडीप होती. प्रत्येकी 600 क्सुसेक पाणी सोडूनही वरसगाव व पानशेत धरणातील पाण्याची पातळी जवळपास 100 टक्क्यांवर आली आहे. टेमघरमधून 350 क्सुसेकने पाणी सोडले जात आहे.

पावसाचा जोर ओसरला असला तरी रिमझिममुळे धरणसाठ्यात भर पडत आहे. खडकवासला धरणातून पिण्यासाठी तसेच शेतीसाठी 1700 क्सुसेकने पाणी सोडले जात आहे. रिमझिमीने धरणांत पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे पाणी सोडूनही धरणसाखळीतील पाण्याची पातळी स्थिर आहे. तीन दिवसांच्या पावसामुळे अर्धा टीएमसीपेक्षा अधिक पाणी धरणांत जमा झाले. याचा लाभ शेतीसह पुणेकरांना झाला आहे. अद्यापही रायगड जिल्ह्यालगतच्या धरण क्षेत्रात पावसाळी वातावरण कायम आहे, त्यामुळे पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
    – मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग

 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news