

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी- चिंचवड महापालिकेतर्फे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी उर्दू माध्यमाच्या 14 शाळा चालविण्यात येत आहेत. यामध्ये सुमारे चार हजार विद्यार्थ्यांसाठी केवळ 102 शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षक कमी असल्याने त्याचा शिक्षणावर परिणाम होत आहे. आकुर्डी येथील स्व. फकिरभाई पानसरे या उर्दू शाळेची अवस्था तर अधिकच दयनीय आहे. येथील प्राथमिक शाळेत सुमारे 640 विद्यार्थी शिक्षण घेत असून तेथे फक्त 9 शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांनी शिक्षण कसे घ्यावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
व्हरंड्यात बसून विद्यार्थी घेतात शिक्षण
आकुर्डी येथील उर्दू शाळेचा हॉल एका खासगी क्रीडा संस्थेस भाड्याने दिला असल्याने विद्यार्थ्यांना शाळेच्या व्हरंड्यात बसून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका अद्यादेशानुसार शिक्षण संस्थेतील हॉल इतर कोणत्याही खासगी संस्थेस भाड्याने देऊ नये, असे असूनही महापालिका अधिकार्यांच्या संगनमताने उर्दू शाळेचा हॉल भाड्याने दिला आहे.
स्वच्छतागृह अस्वच्छ
त्यामुळे पालकसभा, सांस्कृतिक कार्यक्रम व शैक्षणिक प्रक्षिशण असे उपक्रम घेता येत नाही, तसेच शिक्षकांसाठी स्टाफ रूम, विद्यार्थ्यांसाठी प्रयोग शाळाही उपलब्ध नाही, तसेच स्वच्छतागृह अपुरे व अस्वच्छ असून त्याच्याशेजारीच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असल्याने दुर्गंधीयुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना पाणी प्यावे लागते. वर्गखोल्यांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या असून दरवाजेदेखील मोडकळीस आले आहेत. उर्दू माध्यमिक शाळेचीही अवस्था यापेक्षा वेगळी नाही.
सदर इमारत 50 वर्षे जुनी असल्याने मोडकळीस आली आहे. तेथे 18 वर्ग खोल्या असून 575 विद्यार्थ्यासाठी फक्त 10 वर्ग खोल्या असून एकाच वर्गखोलीला दोन तुकड्या पूर्व-पश्चिम असे बसून विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यासाठी समोरा-समोरील भिंतीवर फळे लावलेले आहेत. शिक्षकसंख्या अपुरी, प्रयोग शाळेच्या खोलीत इतर साहित्य ठेवल्याने ती खोली प्रयोग शाळेची की, अडगळीचे साहित्य ठेवण्याची? हाच प्रश्न पडतो. येथेही स्टाफ रूम नाही, स्वच्छतागृह दोनच अशी परिस्थिती आहे. तसेच गेली 5 वर्षांपासून शासनाकडून घेण्यात येणारे सेट – नेट परीक्षेतील पात्र शिक्षकांची नेमणुका रेस्टरच्या अपूर्णतेचा घोळाचा संदर्भ देत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात आहे.
आम्ही महापालिका शिक्षण विभागाकडे वारंवार शिक्षक आणि शाळेतील सुविधांविषयी पाठपुरावा करत आहोत. पुरेशा शिक्षक संख्येअभावी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. तसेच अपुर्या वर्गखोल्या असताना शाळेचा हॉल भाड्याने दिल्याने विद्यार्थ्यांची बसण्याची गैरसोय होत आहे.
-इखलास सय्यद, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी