

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्ट्यांत मोठ्या प्रमाणात निर्माण होणार्या कचरा तेथेच जिरवला जाणार आहे. इंदूर शहराच्या धर्तीवर ही झिरो वेस्ट (शून्य कचरा) संकल्पना महात्मा गांधी जयंतीच्या मुहूर्तावर 2 ऑक्टोबर 2023 पासून आठ ठिकाणी म्हणजे प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय हद्दीत प्रत्येक एक झोपडपट्टीत सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे मोशी कचरा डेपोवरील कचर्याचा ताण कमी होणार आहे. शहरात घोषित व अघोषित अशा एकूण 95 झोपडपट्ट्या आहेत. शहरातून दररोज 1 हजार 200 टन कचरा दररोज जमा होता. तो ओला, सुका, मिश्र, हॉटेल, मंडई, ग्रीन, चिकन अशा प्रकारचा असतो. त्यातील सुका कचरा वेगळा करून त्याचा पुनर्वापर केला जात आहे. तर, ओला कचरा मोशी कचरा डेपोत डम्प केला जातो.
महापालिकेने पालिका व खासगी शाळांमध्ये झिरो वेस्ट संकल्पना राबविली आहे. अशा शाळा व महाविद्यालयांना मिळकतकरात सूट देण्यात येत आहेत. त्याच पद्धतीने झोपडपट्टी भागातही झिरो वेस्ट संकल्पना राबविण्यात येत आहे. भोसरी-एमआयडीसीतील 398 घरे असलेल्या गवळीमाथा झोपडपट्टीतून ती संकल्पना गेल्या वर्षीपासून राबविण्यात येत आहे. घरोघरी जाऊन कचरा जमा केला जातो. सुक्या कचर्याचा पुनर्वापर तर, ओल्या कचर्यापासून खतनिर्मिती केली जाते. झोपडपट्टीतील महिला बचत गटाद्वारे त्याचे संचालक केले जात आहे. ते खताची विक्री करतात.
त्याप्रमाणे सर्व क्षेत्रीय कार्यालयातील एका झोपडपट्टीत झिरो वेस्ट संकल्पना राबविली जाणार आहे. मोरवाडी, रावेत-किवळे, इंद्रायणीनगर, पिंपळे निलख, शांतीनगर-भोसरी, फुलेनगर, शास्त्रीनगर-पिंपरी, दापोडी अशा 8 ठिकाणी त्यासाठी कचरा संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याचे काम स्थानिक महिला बचत गटांना देण्यात येणार आहे. त्या सर्व ठिकाणी 2 ऑक्टोबरपासून झिरो वेस्ट उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने आरोग्य विभागाकडून कार्यवाही सुरू आहे.
झोपडपट्ट्या कचरामुक्त होणार
शहरातील सर्व झोपडपट्ट्या 'झिरो वेस्ट' करण्याबाबत महापालिकेकडून टप्प्याटप्प्याने पावले उचलण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात सर्व आठ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील एका झोपडपट्टीत एक केंद्र सुरू करण्यात येत आहे. तेथे जमा झालेल्या ओल्या कचर्यापासून खत निर्माण केले जाणार आहे. सुका कचर्यापासून पुनर्वापर होणार आहे. त्यामुळे त्याच ठिकाणी संपूर्ण कचर्याची विल्हेवाट लागणार आहे, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.
आठ ठिकाणी प्रकल्प राबविणार
तत्कालीन आयुक्त राजेश पाटील हे झिरो वेस्ट उपक्रम शहरातील सर्व झोपडपट्ट्यांत 2 ऑक्टोबर 2022 पासून राबविणार होते. मात्र, पाटील यांची अचानक बदली झाली. त्यामुळे याकडे आरोग्य विभाग तसेच, समाज विकास विभागाचे दुर्लक्ष झाले. आता ही योजना केवळ 8 क्षेत्रीय कार्यालयातील एका झोपडपट्टीत राबविली जात आहे.