Purva Valase Patil ‘नवे पर्व, नवा ध्यास’टॅगलाईन घेऊन पूर्वा वळसे पाटील उतरल्या मैदानात ! | पुढारी

Purva Valase Patil 'नवे पर्व, नवा ध्यास'टॅगलाईन घेऊन पूर्वा वळसे पाटील उतरल्या मैदानात !

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची मुलगी पूर्वा ‘नवे पर्व , नवा ध्यास’ही खास टॅगलाईन घेऊन प्रथमच वडीलांच्या आंबेगाव- शिरूर मतदारसंघाच्या मैदानात उतरल्या आहेत. मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना पुर्वा या हजेरी लावताना दिसत आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पूर्वा वळसे पाटील पूर्ण तयारीने मैदानात उतरल्या असल्याची चर्चा यामुळे मतदार संघात रंगली आहे. सध्या जिल्ह्यात आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. खासदार, आमदार आपल्या मतदार संघात अधिकच सक्रीय झाले आहेत.२०२४ ची निवडणुक परिवर्तनाची निवडणूक असेल अशी चिन्हे आताच दिसू लागली आहेत. अनेक मतदार संघात नवीन चेहरे, आमदार, खासदारांची पुढची पिढी राजकारणात सक्रीय होताना दिसत आहे.

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे गेले 30-35 वर्षे आपल्या आंबेगाव तालुक्यावर ,मतदार संघावर निर्विवाद आहे. तालुक्यातील बहुतेक सर्व संस्था देखील वळसे पाटील यांच्या ताब्यात आहेत. अशा परिस्थितीत वळसे पाटील आपल्या पुढच्या पिढीला राजकारणात स्थिरस्थावर करण्याच्या तयारीत आहेत. सध्या वळसे-पाटील यांचे दोन्ही पुतणे राजकारणात सक्रीय असले तरी केवळ ठराविक संस्थापुरतेच ते मर्यादित आहेत. गेल्या काही वर्षांपासून वळसे-पाटील यांची मुलगी पुर्वा वळसे-पाटीलच त्यांचा वारसा पुढे चालवणार अशी चर्चा आहे.

गेल्या काही वर्षांपासून पूर्वा वळसे-पाटील देखील विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदार संघात अधूनमधून हजेरी लावत आहेत. कोरोना काळात मतदार संघात लोकांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरून त्यांनी काम केले आहे,परंतु आता पर्यंत कधीही मतदार संघातील दौऱ्याची, कामाची फारशी प्रसिध्दी पुर्वा यांनी केली नाही. परंतु आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर प्रथमच शिरूर तालुक्यातील आंबेगाव विधान सभा मतदारसंघातील जांबूत गावात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आयोजित कार्यक्रमात’नवे पर्व, नवा ध्यास’ ही खास ‘टॅगलाईन’ घेऊन पूर्वा वळसे पाटील यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात यापुढे आता आपण नियमित भेटत जाऊ असे सुचक विधान देखील पूर्वा वळसे पाटील यांनी येथे केले. या नव्या ‘टॅगलाईन’मुळे पूर्वा वळसे पाटील मतदार संघात अधिक सक्रीय होताना दिसत असून, पूर्ण तयारीने मैदानात उतरल्या असल्याची चर्चा मतदार संघात सध्या रंगली आहे.

हेही वाचा :

Ajit Pawar : शिक्षकांनी आधी चांगलं इंग्लिश शिकायाला हवं; अजित पवारांनी शिक्षकांचे टोचले कान

रायगड : गणेशोत्‍सवासाठी मध्य व पश्चिम रेल्वेकडून ३१२ विशेष फेऱ्या

Back to top button