सिलिकॉन व्हॅलीमध्ये होणार मराठीजनांचे संमेलन | पुढारी

सिलिकॉन व्हॅलीमध्ये होणार मराठीजनांचे संमेलन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या वतीने ‘बीएमएम 2024’ या देशाबाहेरील सर्वांत मोठ्या मराठीजनांच्या द्वैवार्षिक संमेलनाचे आयोजन 27 ते 30 जून 2024 दरम्यान अमेरिकेतील कॅलिफोर्नयिा राज्यातील सॅन होजे येथे करण्यात येणार आहे. चार दिवस चालणार्‍या या संमेलनात मराठी कला, संस्कृती, परंपरा आणि खाद्यसंस्कृतीचा उत्सव साजरा करण्याबरोबरच व्यापारी परिषद, ज्येष्ठ नागरिकांसंबंधी असलेले विशेष कार्यक्रम, विवाह करू इच्छिणार्‍या तरुण-तरुणींचा मेळावा, लघुपट महोत्सव, अशा अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती अमेरिकेच्या बे एरिया (सिलिकॉन व्हॅली)मधील उद्योजक व या संमेलनाचे निमंत्रक प्रकाश भालेराव यांनी पत्रकार परिषदेत दिली. बीएमएमचे प्रतिनिधी दिमाख सहस्रबुद्धे, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघ मर्यादितचे सुहास पटवर्धन या वेळी उपस्थित होते.

नोकरी, व्यवसाय, शिक्षण आदी क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधींमुळे मोठ्या प्रमाणात मराठी माणूस अमेरिकेत वास्तव्यास आहे. अमेरिकेतील मराठी माणसाला एकत्र आणत मराठी संस्कृती जपणे व एकमेकांना मदत होईल, असे काही उपक्रम राबविण्यात अमेरिकेत 1981 साली स्थापन झालेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाचा (बीएमएम) सिंहाचा वाटा आहे.

– प्रकाश भालेराव, निमंत्रक

Back to top button