काय सांगता? याआधी तीन मुली, नंतर तिळ्यांना जन्म; पुण्यात महिलेची यशस्वी प्रसुती | पुढारी

काय सांगता? याआधी तीन मुली, नंतर तिळ्यांना जन्म; पुण्यात महिलेची यशस्वी प्रसुती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मूळची उत्तर प्रदेशची असलेली महिला पुण्यात काही वर्षांपासून वास्तव्यास आहे. गर्भवती महिलेला कळा सुरू झाल्याने औंध जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या वेळी महिलेने घरीच एका बाळाला जन्म दिल्याचे सांगितले. रुग्णालयात आणखी दोन बाळांना महिलेने जन्म दिला. यापैकी दोन मुली आणि एक मुलगा आहे. महिला आणि तिन्ही बाळे सुखरूप असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

नसीमा मुलीन अली असे महिलेचे नाव असून, तिला आपल्या पोटात किती गर्भ आहेत, याची कल्पना नव्हती. प्रसूतीकळा घरीच सुरू झाल्या आणि महिलेने एका बाळाला घरीच जन्म दिला. महिला 22 ऑगस्ट रोजी औंध जिल्हा रुग्णालयात दाखल झाली. तिने सायंकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी दुस-या मुलीला व त्याच्या पाठोपाठ 7 वाजून 56 मिनिटांनी तिस-या मुलीला जन्म दिला. दोन्ही मुलींचे वजन 1400 व 1450 ग्रॅम असे कमी आहे. घरी जन्मलेल्या मुलाचे वजन 1620 ग्रॅम आहे. नसीमाला याआधी तीन मुली आहेत.

घरी जन्मलेल्या बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याच्यासह रुग्णालयात जन्मलेला मुलींना रुग्णालयाच्या विशेष नवजात शिशू विभागात दाखल करण्यात आले. तिन्ही नवजात बालकांना ऑक्सिजन, सलाईन देण्यात आले. अकरा दिवस उपचार दिल्यानंतर बाळांचे वरचे दूध बंद करून आईचे दूध देण्यात आले. आता महिलेसह बाळांना लवकरच डिस्चार्ज दिला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी दिली.

महिला गरीब असून, साडेआठ महिन्यांत तिची प्रसूती झाली. आता बाळांची तब्येत चांगली आहे. तिळे जन्माला येणे ही दुर्मीळ घटना आहे. यापूर्वी 2016 मध्ये चार बाळे जन्माला आली होती.

– डॉ. सुरेश लाटणे, एसनसीयू विभाग प्रमुख, जिल्हा रुग्णालय, औंध

हेही वाचा

पुणे : समितीवरुन महायुतीतच शह काटशहाचे राजकारण; पालिका प्रशासनासमोर पेच

शरद पवारांकडून मराठा आरक्षणाबाबत दुर्लक्ष; खा. उदयनराजे भोसले यांचा आरोप

तलाठी परीक्षेदरम्यान महिला परिक्षार्थीकडे आढळले इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस

Back to top button