पुणे : बदली झाली, तरी खुर्ची सोडवेना! | पुढारी

पुणे : बदली झाली, तरी खुर्ची सोडवेना!

हिरा सरवदे

पुणे : महापालिका प्रशासनाने मोठा गाजावाजा करत वर्षानुवर्षे एकाच विभागात कार्यरत असलेल्या अधीक्षक, उपअधीक्षक, लिपिक आणि बिगार्‍यांच्या बदल्या केल्या. मात्र, बदली झालेले काही जण अद्यापही जुन्याच ठिकाणी काम करत असून, राजकीय दबावापोटी काहींच्या बदल्या रद्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महापालिकेतील अधिकार्‍यांची संबंधित विभागात मक्तेदारी, हितसंबंध निर्माण होऊ नयेत, यासाठी दर तीन वर्षांनी बदली केली जाते.

मात्र, काही जण दहा-दहा वर्षे एकाच विभागात आणि एकाच टेबलवर काम करतात. बदली करू नये, यासाठी दर ठरलेले असून, त्यात वरिष्ठांचाही वाटा असल्याने घासाघीस करू नये, असे अधिकार्‍यांकडून सांगितले जाते. पैसे देऊन नेमणुका करवून घेतल्याने अधिकारी सेवा हमी कायद्याचे सर्रास उल्लंघन करतात. गेल्या वर्षभरापासून पुण्यात प्रशासकराज आहे. या काळात संबंधित कायद्याची अंमलबजावणी करण्यास आयुक्त तथा प्रशासकांना पूर्ण वाव होता. मात्र, या काळात पालिकेतील सर्वच विभागांत भ्रष्टाचार बोकाळल्याचा आरोप राजकीय पदाधिकार्‍यांनी केला होता तसेच तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेल्यांच्या इतर विभागात बदल्या करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासनाने विविध विभागांत काम करणार्‍या कर्मचार्‍यांची सेवा ज्येष्ठता तपासून चार वर्षांहून अधिक काळ एकाच विभागात काम करणार्‍यांची यादी करून बदल्यांचे आदेश काढले.

राजकीय दबावामुळे काहींच्या बदल्या रद्द

हे आदेश काढताना प्रत्येक खात्यात 20 टक्के अनुभवी कर्मचारी राहातील, याची दक्षता घेण्यात आली. त्यानुसार अधीक्षक, उपअधीक्षक आणि लिपिक, टंकलेखक, आरोग्य विभागात काम करणारे बिगारी यांच्या बदल्या केल्या होत्या. या बदल्या जून महिन्यात करण्यात आल्या होत्या. मात्र, अद्यापही काही जण मूळ ठिकाणीच काम करत असल्याचे आणि ते अद्याप बदली झालेल्या ठिकाणी रुजू झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले तसेच बदली झालेल्या अनेकांनी राजकीय वजन वापरून आपली बदली रद्द केली आहे.

विभागप्रमुखांनी दिले चुकीचे अहवाल
बदली प्रक्रिया राबवल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने बदली झालेले कर्मचारी दिलेल्या ठिकाणी रुजू झाल्यानंतर ते रुजू झाल्याचा अहवाल विभागप्रमुखांनी द्यावा, असे आदेश दिले होते. तसेच आपल्या विभागातील बदली झालेल्या कर्मचार्‍याला सोडल्याचाही अहवाल देण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, अनेक विभागप्रमुखांना जुना कर्मचारी न सोडता आणि नवीन कर्मचारी रुजू झालेला नसतानाही यासंदर्भात खोटे अहवाल पाठवल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. विशेष म्हणजे, याबाबत तक्रारी करूनही वरिष्ठांकडून दखल घेतली जात नसल्याचे काही कर्मचार्‍यांनी सांगितले.

बदली होऊनही कोणी दिलेल्या ठिकाणी रुजू होत नसेल, तर त्यांच्या जागेवर बदली झालेल्या कर्मचार्‍यांनी तक्रार करावी. तक्रार आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला जाईल.
                                     – रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

Back to top button