पुणे, पुढारी वृत्तसेवा : 65 वी महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) कुस्ती स्पर्धेचा थरार धाराशिवमध्ये रंगणार आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे ही घोषणा केली आहे. यंदा दि. 1 ते 5 नोव्हेंबर दरम्यान तुळजाभवानी क्रीडा संकुल येथे ही स्पर्धा होणार आहे. धाराशिव जिल्ह्याला पहिल्यांदाच स्पर्धेचा मान मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि आयोजकांची संयुक्त बैठक उस्मानाबाद येथे झाली. या बैठकीत स्पर्धेची तारीख जाहिर करण्यात आली. गेल्याच वर्षी धाराशिव येथे स्पर्धा घेण्याबाबतचा निर्णय परिषदेच्या वतीने घेण्यात आला होता. या निर्णयाप्रमाणे ही स्पर्धेची तारीख जाहिर करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने धाराशिव जिल्हा कुस्ती तालीम संघ आणि आदर्श शिक्षक प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांच्या उपस्थितीत ही महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा पार पडणार आहे.
महाराष्ट्र केसरीच्या मानकरीला स्कॉर्पिओ, उपविजेत्याला टॅक्टर, तर वजनी गटातील प्रथम विजेत्याला बुलेट, दुसर्या क्रमांकाला स्पलेंडर तर तिसर्या क्रमांकाच्या विजेत्याला रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी मॅटचे तीन व मातीचे दोन असे पाच आखाडे तयार करण्यात येणार आहेत. या स्पर्धेत 1500 खेळाड, पंच, प्रशिक्षक आणि तांत्रिक अधिकारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी दिली.