पुणे शहरात मुसळधार, धरण क्षेत्रात उघडीप | पुढारी

पुणे शहरात मुसळधार, धरण क्षेत्रात उघडीप

वेल्हे(पुणे) पुढारी वृत्तसेवा : पुणे शहरासह सिंहगड रोड, वडगाव, धायरी परिसरात शनिवारी (दि. 2) मुसळधार पाऊस पडला. मात्र, चारही धरण क्षेत्रांत पावसाची उघडीप होती. सायंकाळी पाचपर्यंत खडकवासला धरणसाखळीत 27.47 टीएमसी म्हणजे 94.24 टक्के पाणीसाठा झाला होता. शनिवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाचपर्यंत खडकवासला धरणमाथ्यावर 4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जोरदार पाऊस पडणार्‍या टेमघर, पानशेत व वरसगाव येथे एक मिलीमीटरही पावसाची नोंद झाली नाही.

वरसगाव धरणातून सकाळी दहा वाजता वीजनिर्मिती प्रकल्पाच्या सांडव्यातून सकाळी दहा वाजता 600 क्सुसेक विसर्ग सुरू करण्यात आला. धरण क्षेत्रांत उघडीपीमुळे पाण्याची आवक नसल्याने विसर्ग बंद करण्यात येणार आहे. पानशेत धरण प्रकल्पाचे शाखा अभियंता अनुराग मारके म्हणाले, धरणाखाली पाऊस पडत आहे. धरण क्षेत्रात पाऊस नसल्याने पाण्याची आवक वाढली नाही. वरसगावमधून सोडण्यात येत असलेला विसर्ग पाण्याची आवक न वाढल्यास रविवारी (दि. 3) विसर्ग बंद करण्यात येणार आहे.

पानशेत धरण खोर्‍यातील रायगड जिल्ह्यालगतच्या पानशेत, वरसगाव धरण क्षेत्रांत गेल्या सहा दिवसांपासून उघडीप आहे.
तुरळक पावसाचा अपवाद वगळता ढग विरळ होऊन ऊन पडत आहे. पाण्याची आवक कमी झाल्याने पानशेत धरणातील विसर्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातील पाण्याची पातळी कमी होत आहे.

धरणांतील पाणीसाठा टीएमसीत कंसात टक्केवारी
टेमघर 2.97 (80.03)
वरसगाव 12.72 (100)
पानशेत 10.65 (100)
खडकवासला 1.04 (52.51)

हेही वाचा

Bhatghar dam : पर्यटनाला जाताय, तर आधी जीव सांभाळा ! भाटघर धरणात बुडून पर्यटकाचा मृत्यू

श्रीरामपूर : पावसाअभावी सोयाबीन पिकाने दिला धोका

अहमदनगर विभागाला 65 लाखांचा फटका; 11 आगारांची एसटी बस सेवा ठप्प

Back to top button