

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मी चिंचवड येथील मरहूम फकीरभाई पानसरे उर्दू प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी. शाळेत ये-जा करण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरासाठी आम्हांला दोन बस बदलाव्या लागतात. केएसबी चौकात चार दिवसांपूर्वी बसची वाट पहात होते. खूप वेळ झाला बस आली नाही. शेवटी पायी चालत घर गाठले आणि आजारी पडले. तेव्हापासून शाळेला गेलेच नाही. हे आहे स्मार्ट पिंपरी- चिंचवडमधील पालिकेच्या स्मार्ट शाळांतील चित्र. दरम्यान, मनपाकडून उपनगरांतील काही विद्यार्थ्यांना पीएमपीएल बस उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, 12 वर्षे पाठपुरावा करत असलेल्या उर्दू शाळेस अद्याप बस मिळाली नाही.
त्यामुळे उर्दू शाळेतील मुलांच्या शिक्षणाची वाट बिकट बनली आहे. महापालिकेने सर्व शाळा खासगी शाळांच्या तुलनेत डिजिटल स्मार्ट केल्या आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना वाहतुकीची सुविधा देण्यात पालिका कमी पडल्याचे दिसते. काही परिसर सोडल्यास उपनगरातील विद्यार्थ्यांना शहरात येण्यासाठी पीएमपीतून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. चिंचवड येथील उर्दू शाळेमध्ये जवळपास 80 टक्के विद्यार्थी हे कुदळवाडी, पवारवस्ती, चिखली येथून येतात. त्यांना जाधववाडी उर्दू शाळा जवळ आहे. मात्र, याठिकाणी 700 ते 800 पटसंख्या आणि वर्गखोल्या नसल्याने तसेच याठिकाणीदेखील आडबाजू असल्याने वाहतुकीची सोय नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना चिंचवडच्या शाळेत यावे लागते.
चिंचवड व आकुर्डी येथील उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना रोजच ये-जा करताना दोन बस बदलाव्या लागतात. चिंचवडवरून केएसबी चौकात एका बसने त्यानंतर भोसरी व आळंदीमार्गे जाणार्या, चिखलीमार्गे जाणार्या बसने घरापर्यंत असा प्रवास चिंचवड येथील विद्यार्थ्यांचा होतो. तर आकुर्डी येथील विद्यार्थ्यांना पिंपरीतील मोरवाडी चौकात एका बसने आणि तेथून पुन्हा चिखलीमार्गे बसने घरी असा प्रवास करावा लागतो. निदान शाळेच्या वेळेत तरी एकच थेट बस द्या, अशी मागणी आहे.
चिंचवड उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकांकडून तातडीने बसचा प्रस्ताव मागवून घेतो. त्यावर आयुक्तांशी चर्चा करून लगेच बस कशी उपलब्ध करून देता येईल, यावर निर्णय घेऊ.
संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी, पिं. चिं. मनपा
हेही वाचा