पुणे : कुकडीचे आवर्तन 10 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार | पुढारी

पुणे : कुकडीचे आवर्तन 10 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कुकडी प्रकल्पामध्ये सध्या 22.2 टीएमसी पाणीसाठा इतका पाणीसाठा आहे. सद्य:स्थितीत कुकडी प्रकल्पातून खरिपाचे आवर्तन सुरू आहे. हे आवर्तन 42 दिवसांचे करण्यात आले आहे. त्यानुसार ते 10 सप्टेंबरपर्यंत सुरू राहील, असा निर्णय शनिवारी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. कुकडी आणि घोड प्रकल्पाची खरीप हंगाम सन 2023-24 च्या नियोजनाबाबत कालवा सल्लागार समितीची बैठक मंत्री चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

त्या वेळी हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीसाठी नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अतुल बेनके, अशोक पवार, बबनराव पाचपुते, राम शिंदे, बाळासाहेब आजबे, हर्षवर्धन पाटील, कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) हनुमंत धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला कालवा सल्लागार समितीचे सदस्य संतोष सांगळे यांनी कुकडी व घोड प्रकल्पातील सध्याच्या पाणीसाठ्याची माहिती दिली. त्यानुसार सध्या कुकडीमध्ये 22.3 टीएमसी (74.81 टक्के ) इतका पाणीसाठा आहे. कुकडी प्रकल्पामधून खरिपाचे आवर्तन 28 जुलैपासून सुरू आहे. याचा आढावा बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन 10 सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

घोड प्रकल्पामधून खरीप आवर्तन देणे अवघड

या बैठकीतच घोड प्रकल्पाबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार या प्रकल्पात सध्या 1.14 टीएमसी पाणीसाठा आहे. या पाणीसाठ्यामधून खरीप आवर्तन देणे अवघड असल्याचे सांगण्यात आले. मात्र, घोड लाभ क्षेत्रातील उभी पिके जळण्याच्या स्थितीत आल्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधीनी खरीप हंगामाचे आवर्तन सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. ही बाब लक्षात घेऊन या प्रकल्पातील पिण्याच्या पाण्यासाठी पुढील 4 महिन्यांसाठी आरक्षित ठेवून उर्वरित 1 टीएमसी इतक्या पाण्यातून घोड प्रकल्पाचे खरीप आवर्तन सुरू ठेवण्यात येईल, असा निर्णय या वेळी घेण्यात आला. सध्या पावसामुळे धरणामध्ये पाणी कमी आहे, ही बाब लक्षात घेऊन पाणीसाठ्याचा वापर काटकसरीने करावा. त्यासाठी अधिकार्‍यांनी काटेकोर नियोजन करावे, असा सूचना देण्यात आल्या.

हेही वाचा

Milk News : दूध, मिठाईच्या दुकानांतील पदार्थही रडारवर; भेसळ करणार्‍यांवर गुन्हे दाखल करा

बहार विशेष : ‘पुढारी न्यूज’ माध्यम जगातलं नवं पाऊल!

‘जी-20’ परिषद भारतासाठी सुवर्णसंधी

Back to top button