Pune Gramin Police : दुष्काळी स्थितीमुळे पुणे जिल्हा पोलीसांचे ‘टेंशन’ वाढले

Pune Gramin Police : दुष्काळी स्थितीमुळे पुणे जिल्हा पोलीसांचे ‘टेंशन’ वाढले

यवत(पुणे) : ऑगस्ट महिना संपला तरी धरणक्षेत्र वगळता संपूर्ण जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकरी वर्ग संकटात आला असताना, अशातच जिल्हा पोलीस दलाचे देखील 'टेंशन' वाढले असल्याचे पहायला मिळत आहे. जून जुलै आणि ऑगस्ट महिना कोरडा गेल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाने दडी मारली असल्याने संपूर्ण जिल्ह्यात चोऱ्याचे प्रमाण लक्षणीय रित्या वाढले आहे. त्यामुळे पोलिसांची देखील डोकेदुखी वाढली आहे

दुष्काळी परिस्थितीचा फटका शेतकरी वर्गाला ज्या पद्धतीने बसत आहे. त्याच पद्धतीने पोलीस दल देखील 'टेंशन' मध्ये आले आहे. गेल्या महिनाभरात ग्रामीण भागातील जवळपास सर्वच पोलीस स्टेशनमध्ये दिवसभरात किंवा दिवसाआड घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल होत असून यात भुरट्या चोऱ्यासह मोठ्या रक्कमेच्या चोऱ्या होत असल्याचे दिसून येत आहे पाऊस पडला नसल्याने सर्वच भागातील मजूरांना काम मिळत नाही त्यामुळे रोजचा खर्च कसा भागवावा या चिंतेत असणारे काही लोक चोऱ्या करण्याचा निर्णय घेतात. तसेच चोऱ्या करण्याचे काम सोडून मोलमजुरी करणारे काही लोक देखील काम मिळाले नाहीतर नाइलाजाने दुष्काळी परिस्थितीमुळे चोरी करण्याकडे वळतात आणि चोऱ्याचे प्रमाण वाढते असे साधारपणे दिसते

गेल्या काही दिवसात झालेल्या चोऱ्या उघडकीस आणण्यात देखील पोलिसांना यश आले आहे हे नाकारून चालणार नाही. पावसाळी हंगामात समाधानकारक पाऊस झाला. तर या घटनांना काही प्रमाणात आळा बसतो असे ज्येष्ठ व्यक्ती व अधिकारी आवर्जून सांगतात त्यामुळे वरुणराजा रुसून बसल्याचा फटका शेतकरी वर्गा इतकाच पोलीस दलाला देखील बसला असून चोरीच्या घटना वाढीस लागल्या असल्याने बऱ्याच कर्मचारी आणि अधिकारी वर्गाच्या सुट्ट्या रद्द केला जात आहेत तर प्रभारी अधिकारी यांना देखील साप्ताहिक सुट्टी घेण्याऐवजी तपास करा असे सांगितले जात आहे. चोरीच्या वाढत्या घटना पाहता गणपती उत्सव काळात देखील पावसाने ओढ दिली तर पोलीस दल मात्र पुरते हवालदिल होऊन जाईल यात शंका नाही.

अधिक्षकांच्या सक्त सूचना

गेल्या दोन ते तीन महिन्यात जिल्ह्यात वाढलेल्या चोऱ्याचे प्रमाण पाहता पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीत नाकाबंदी करणे, रात्रीच्या वेळी गस्त वाढवणे अशा सूचना दिल्या असल्याने काही प्रमाणात चोऱ्याना आळा बसला असला तरी चोरीच्या घटना पूर्णपणे बंद झालेल्या नाहीत.

गेल्या काही दिवसांत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चोरीच्या घटना घडल्या होत्या,त्यातील बरेच गुन्हे स्थानिक पोलीस स्टेशन आणि जिल्हा पोलीस दलाची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी एकत्रितपणे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली महत्वाची भूमिका बजावली आहे. पुढील काळात देखील चोरीच्या घटना उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कामकाज सुरू आहे.

-अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीण)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news