अखेर वरसगाव धरण भरले… खडकवासला धरणसाखळीत 94.57 टक्के साठा | पुढारी

अखेर वरसगाव धरण भरले... खडकवासला धरणसाखळीत 94.57 टक्के साठा

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा :  ऐन पावसाळ्यात धरणसाखळीत दोन दिवसांपासून कडकडीत ऊन पडत आहे. तीन दिवसांपासून 99 टक्क्यांवर असलेले वरसगाव (वीर बाजी पासलकर जलाशय) धरण अखेर बुधवारी (दि. 30) सायंकाळी सव्वासात वाजता शंभर टक्के भरले. बुधवारी सायंकाळी पाच वाजता चार धरणांच्या खडकवासला धरणसाखळीत 27.57 टीएमसी म्हणजे 94.57 टक्के पाणी साठा होता. सकाळपासून कडकडीत ऊन होते. आकाशात पावसाचे ढग दाटून येत होते. मात्र, काही क्षणातच ढग विरळ होऊन कडक ऊन पडत होते. चारही धरण माथ्यावर पावसाची नोंद झाली नाही.

उन्हामुळे खडकवासला सिंहगड भागातील ओढे-नाले कोरडे पडले आहेत. पानशेत, वरसगाव खोर्‍यांत मात्र ओढ्या-नाल्यांतून मंद आवक सुरू आहे. पानशेत धरण प्रकल्पाचे शाखा अभियंता अनुराग मारके म्हणाले, ’पावसाने उघडीप दिल्याने पाण्याची आवक कमी झाली आहे. सायंकाळी वरसगाव धरण शंभर टक्के भरले. मात्र, पावसाअभावी पाण्याची फारशी आवक नाही. त्यामुळे विसर्ग सुरू केला नाही. आवक वाढल्यास वीज निर्मिती सांडव्यातून पाणी सोडले जाणार आहे.’

हेही वाचा : 

दुचाकीस्वारावर बिबट्याचा हल्ला ; ओतूर हद्दीतील घटना

पुणे : दागिने हिसकावणार्‍या हातात पडल्या बेड्या !

Back to top button