खडकवासला धरणात कार कोसळली

खडकवासला धरणात कार कोसळली

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : पुणे-पानशेत रस्त्यावर पानशेत-कुरण खुर्दजवळ खडकवासला धरणात कोसळून कारसह एक मुलगी बेपत्ता झाली. कारमधील चौघांना वाचविण्यात स्थानिक नागरिकांना यश मिळाले आहे. रात्री उशिरापर्यंत पीएमआरडीएच्या अग्निशामक दलाच्या जवानांच्या मदतीने स्थानिक नागरिकांसह वेल्हे पोलिसांचे शोध कार्य सुरू होते.

आय ट्व्हे़ंटी कारमधून पानशेत (ता. वेल्हे) येथील प्रदीप सोमनाथ पवार (वय 40), त्यांची पत्नी, दोन मुली व बहीण असे पाच जण बुधवारी (दि. 30) पुण्याहून पानशेत येथे घरी चालले होते. सायंकाळी 7 च्या सुमारास पानशेतच्या अलीकडे कुरण खुर्द गावच्या हद्दीत पानशेत रस्त्याच्या तीव्र उतारावर अचानक कार झाडावर आदळून उजव्या बाजूच्या तीरावरून थेट खडकवासला धरणाच्या पाणलोटात कोसळली. या वेळी रस्त्यावर वाहनांची वर्दळ होती तसेच शेतात काही जण होते. कार पाण्यात कोसळल्याचे स्थानिक नागरिक प्रसंगावधानता दाखवत धरणात उड्या मारल्या.

धरणात बुडणार्‍या कारमधून सोमनाथ पवार व इतर तीन अशा चौघांना बाहेर काढले. मात्र, दुर्दैवाने पवार यांची 13 वर्षे वयाची मुलगी कारमध्येच अडकून पडली. पाण्याला जोरदार प्रवाह असल्याने तसेच या ठिकाणी पात्र खोल असल्याने कार पाण्यात बुडून बेपत्ता झाली. माहिती मिळताच वेल्हेचे सहायक पोलिस निरीक्षक रणजित पठारे, कांतीलाल कोळपे यांच्यासह कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्थानिक नागरिक आणि अग्निशामक दलाच्या 8 ते 10 जवानांनी शोधकार्य सुरू केले. गणेश सपकाळ, तानाजी भोसले आदींसह बचाव पथकाचे जवान सहभागी झाले होते.

हेही वाचा :

logo
Pudhari News
pudhari.news