ज्ञानेश्वर माऊलींसाठी आली मुक्ताईची राखी ! | पुढारी

ज्ञानेश्वर माऊलींसाठी आली मुक्ताईची राखी !

श्रीकांत बोरावके

आळंदी : 

एक आपण साधू झाले । येर कोण वाया गेले ।।१।।
उठे विकार ब्रम्ही मुळ । अवघे मायेचे गाबाळ ।।धृ।।
माया समुळ नुरे जेव्हा । विश्व ब्रम्ह होईल तेव्हा ।।३।।
ऎसा उमज अादि अंती । मग सुखी व्हावे संती ।।४।।
काम क्रोध मागे सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।५।।

असे सांगत तत्कालीन समाजाकडून झालेल्या त्रासाला कंटाळून निराश होत झोपडी बंद करून बसणाऱ्या ज्ञानदेवांना उपदेश करत निराशेच्या गर्तेतून बाहेर काढणाऱ्या मुक्ताईमुळेच ज्ञानदेव संत झाले आणि त्यांनी जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागितले. अशा या लहानग्या मुक्ताईचे भगिनी प्रेम पुन्हा जागविण्याचे काम कोथळी, मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई संस्थानने केले आहे. या संस्थानकडून संत मुक्ताईच्या वतीने भाऊ संत ज्ञानेदेवांसाठी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानकडे राखी अर्पण करण्यात आली. इंद्रायणी नदीच्या घाटांनी, सिद्धेश्वराच्या कळसाने, सुवर्ण पिंपळाच्या पानांनी, देऊळवाड्याने आणि अवघ्या अलंकापुरीने शेकडो वर्षांनंतर हे प्रेम अप्रत्यक्षरित्या अनुभवले असेच म्हणावे लागेल.

श्री मुक्ताई संस्थान कोथळी मुक्ताईनगर यांच्यातर्फे पुरुषोत्तम वंजारी यांनी संपत्नीक पुजा, महाभिषेक करीत मुक्ताईची राखी माऊली चरणी अर्पण केली. यावेळी लाहुळकर महाराज, संदीप पालवे उपस्थित होते. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानतर्फे आदिशक्ती मुक्ताईसाठी साडी-चोळी देण्यात आली.

याप्रसंगी बोलताना आळंदी देवस्थानचे प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले, हा अत्यंत स्तुत्य व उत्स्फूर्त उपक्रम असून अशा गोड कार्यक्रमाचे आम्ही कौतुक करतो. त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा बहिण- भावाचे अनोखे नाते जवळ आल्याची भावना निर्माण झाली. त्यांच्या उपक्रमास शुभेच्छा. ज्ञानदेवांप्रमाणे निवृत्तीनाथ महाराज, सोपानकाका महाराज यांनाही राख्या पाठविण्यात आल्या आहेत.

हेही वाचा :

‘आय फ्लू’ ने पुणेकर त्रस्त ; शहरात 13 हजार जणांना लागण

पुणे : ‘शहरी गरीब’ची उत्पन्न मर्यादा वाढणार

Back to top button