जिवंत देखाव्यांसाठी कलाकारांची रंगीत तालीम | पुढारी

जिवंत देखाव्यांसाठी कलाकारांची रंगीत तालीम

सुवर्णा चव्हाण

पुणे : ‘सादर करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा उलगडणारा जिवंत देखावा’ (सजीव देखावा)….असा आवाज आपल्याला गणेशोत्सवात ठिकठिकाणी ऐकायला मिळणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध विषयांवरील जिवंत देखावे पुणेकरांना पाहायला मिळणार असून, देखाव्यांसाठीची जोरदार तयारी संस्थांमार्फत आणि कलाकारांकडून सुरू आहे. मंडळांकडूनही देखाव्यांसाठीचे बुकिंग झाले असून, काही मंडळांकडून संस्थांकडे विचारणा होत आहे. ऐतिहासिक, पौराणिक देखाव्यांसह यंदा देशभक्तीपर, सामाजिक आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करणारे देखावेही पुणेकरांचे लक्ष वेधणार आहे. कलाकार देखाव्यासाठी जोरदार तयारी करत आहेत.

गणेशोत्सवात जिवंत देखावे (सजीव देखावे) हा महत्त्वाचा भाग बनले असून, उत्सवात दरवर्षी 30 ते 40 टक्के हे जिवंत देखावे असतात. काही संस्थांकडून देखाव्यांचे नियोजन केले जात आहे आणि त्या संस्थांशी मंडळांनी संपर्क साधून देखाव्यांसाठीचे आगाऊ बुकिंगही केले आहे. तर मंडळांच्या ठिकाणी पाच किंवा सहा सप्टेबरनंतर देखाव्यांसाठीच्या सेट उभारणीचे कामही सुरू होणार आहे.
कलाकार राहुल भालेराव म्हणाले, मी गेल्या 25 वर्षांपासून पुण्यात देखाव्यांसाठी काम करत असून, उत्सवात आता या स्वरूपातील देखाव्यांची संख्या वाढत आहे. यंदाच्या देखाव्यांसाठीची तयारी एक महिन्याआधीच सुरू झाली आहे. आम्ही कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या शौर्यगाथेवर आधारित शेरशाह हा देखावा सादर करणार आहोत.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे यंदाचे 350 वे वर्ष असून, या विषयावर आम्ही देखावा सादर करणार आहोत. त्यासाठी 25 ते 30 कलाकार तयारी करत आहेत. प्रत्येकजण खूप मेहनत करत आहे. पाच मंडळांकडून देखाव्यांसाठी विचारणा सुरू आहे.
                                                                        वृंदा साठे, कलाकार.

देखाव्यांमधील विषय
मी वाडा बोलतोय, क्रांतिकारकांचा लढा, वाहतूक नियमन, सोशल मीडियाचा परिणाम, ऑनलाइन जुगार खेळण्याचा दुष्परिणाम, नातेसंबंधातील दुरावा यासह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील काही प्रसंगांवर आधारित देखावे.

Back to top button