भीमाशंकर प्रशासनावर ‘व्हीआयपीं’मुळे ताण | पुढारी

भीमाशंकर प्रशासनावर ‘व्हीआयपीं’मुळे ताण

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सध्या पवित्र श्रावण महिन्यामुळे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक व प्रचंड निसर्गरम्य ठिकाण असलेल्या भीमाशंकर येथे महादेवाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात ‘व्हीआयपी’ भाविक येत आहेत. या ‘व्हीआयपी’ भाविकांची उठाठेव करून सरकारी अधिकारी, कर्मचार्‍यांची दमछाक झाली आहे. सोमवारी एका दिवसात तब्बल 40 हून अधिक ‘व्हीआयपी’ भाविक भीमाशंकर येथे दाखल झाल्याने प्रशासकीय यंत्रणेवर चांगलाच ताण आला.

गेल्या एक महिन्यापासून अधिक मास श्रावण आणि सध्या सुरू असून, असलेल्या श्रावण महिन्यामुळे भीमाशंकर येथे दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी सुरू आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक भीमाशंकर येथे येतात. श्रावण महिन्यात भीमाशंकर परिसरात अत्यंत प्रसन्न वातावरण असते. भीमाशंकर व लगतचा परिसर प्रचंड निसर्गरम्यदेखील असल्याने भीमाशंकरचे अधिक आकर्षण असते. सध्या यामुळेच सर्वसामान्य भाविकांसह देशभरातील अनेक ’व्हीआयपी’ लोकदेखील दर्शनासाठी
येत आहेत.

नवी दिल्लीच्या ‘व्हीआयपी’सह अनेक प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधींचा यामध्ये सहभाग आहे. सहकुटुंब सह परिवार हे ‘व्हीआयपी’ येथे दर्शनासाठी येतात. येण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाला आदेश येतात. संबंधित ’व्हीआयपी’ची सोय करा, परंतु यासाठी कोणताही स्वतंत्र निधी उपलब्ध नसतो. भीमाशंकर परिसरात सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषदेचे गेस्ट हाऊस असले तरी उपलब्ध सरकारी सोयी सुविधा खूपच अपूर्ण आहेत. यामुळे बहुतेक वेळा खासगी ठिकाणी या ‘व्हीआयपी’ भाविकांची सोय करावी लागते. या खर्चाचा भुर्दंड संबंधित स्थानिक अधिकार्‍यांना बसतो. यासह प्रशासकीय कामाचा ताणही असतो. त्यात ’व्हीआयपी’ भाविकांची उठाठेव करताना स्थानिक प्रशासनाची चांगलीच धावपळ सध्या सुरू आहे.

हेही वाचा

काळम्मावाडी आमची रक्तवाहिनी; सीमा भागातील नेत्यांच्या भावना

यंदाचा ऑगस्ट 123 वर्षांतील सर्वात कोरडा

नाशिक : सातपूर-अंबडलिंकरोडवर खड्डा चुकूविण्याच्या नादात कामगाराचा मृत्यू

Back to top button